Monday, June 25, 2018

काम | Desire




विषयाच्या श्रवणाने, दर्शनाने, अथवा प्राप्त केल्यानंतर तो विषय उपभोगण्यासाठी मन अत्यंत अधीर, व्याकूळ होते.  या उपभोगण्याच्या वृत्तीलाच ‘काम’ असे म्हणतात.  या विषयांमधून सुख मिळेल या आशेने मनुष्य इष्ट, प्रिय, अनुकूल विषयांमध्ये उपभोगण्यासाठी प्रवृत्त होतो.  रात्रंदिवस त्याच विषयांचे चिंतन करतो.  मनामध्ये सतत हाव, तृष्णा निर्माण होवून त्याची इंद्रियेही तो विषय उपभोगण्यासाठी वखवखलेली असतात.  या प्रबल इच्छेलाच ‘काम’ असे म्हणतात.

मनुष्याच्या मनामध्ये ज्यावेळी हा ‘काम’ निर्माण होतो त्यावेळी तो विवेकी, श्रेष्ठ पुरुषांनाही भ्रष्ट करतो.  त्यांची बुद्धि विवेकहीन, भ्रष्ट होवून तो मनुष्य संपूर्णपणे कामाच्या आहारी जातो.  सदसद्विवेकबुद्धि नष्ट होते.  सारासार विचार न करता मोहीत होवून तो कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होतो.  इतकेच नव्हे, तर हा काम वृध्द माणसाच्या मनामध्येही भोगलालसा निर्माण करतो.  सामान्यपणे आपण समजतो की, जसजसा मनुष्य वृद्ध होतो तसतसे त्याचे मन अधिक विरक्त, परिपक्व, शांत होते.  परंतु कामाच्या प्रभावामुळे वृद्ध मनुष्यही एखाद्या अविवेकी, कामांध पुरुषाप्रमाणे उपभोगामध्ये प्रवृत्त होतो.

एखादा अत्यंत शांत, संयमी, विवेकी मनुष्य असेल तर अशा जितेंद्रिय पुरुषाच्या मनामध्येही हा काम संताप निर्माण करतो.  या संयमी पुरुषाची दक्षता, सावधानता संपते.  विवेक संपतो.  बुद्धि भ्रष्ट होते.  त्याचे तत्त्वज्ञान लंगडे पडते.  इंद्रिय व मनावरील संयमन सुटते.  त्याचा चांगुलपणा धुळीस मिळतो.  त्याचे पूर्ण अधःपतन होते.  तो अत्यंत कामुक, विषयलंपट होतो असा हा कामाचा परिणाम आहे.

ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जितके इंधन टाकावे तितका अग्नि अधिक भडकतो त्याप्रमाणे हा कामाग्नि सुद्धा कामनांच्या उपभोगामुळे शांत ना होता अधिक वर्धन पावतो. तो कधीही तृप्त होत नाही.  म्हणुनच एकदा मनुष्य कामनेने पेटला की, सर्व ब्रह्मांड सुद्धा ग्रासून टाकण्याचे सामर्थ्य या कामामध्ये आहे म्हणुनच याला ‘कामाचा आवेग’ असे म्हटले आहे.

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Monday, June 18, 2018

विदेहकैवल्यप्राप्ति | Achieving Liberation




१. सर्वत्र ब्रह्मदर्शन,  २. ब्रह्मात्मदर्शन, ३. तन्निष्ठा आणि ४. तत्परायणत्व – हे चार घटक विदेहकैवल्यप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.  म्हणून ज्या साधकांनी निष्काम कर्मयोग आणि उपासना यांचे प्रदीर्घ अनुष्ठान करून चित्तशुद्धि, दैवीगुणसंपत्ति आणि विवेकवैराग्यादि गुण आत्मसात करून ज्ञानसाधनेने अप्रतिबद्ध सहजस्वाभाविक स्वरूपाची अवस्था प्राप्त केलेली आहे, त्यांचे सर्व प्रकारचे अंतरिक दोष नाहीसे होतात.  

स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे अनेक भेद निर्माण होतात.  १) जीव आणि ईश्वर भेद, २) जीव आणि जगत भेद, ३) जगत आणि ईश्वर भेद, ४) जीव आणि अन्य जीव भेद आणि ५) ईश्वर व जीव भेद.  हे सर्व भेद स्वस्वरूपाच्या ज्ञानाने नाहीसे केलेले आहेत अशा विद्वान पुरुषांना पुनरावृत्ति नसलेली परमगति प्राप्त होते.  वर्तमान देहपातानंतर पुन्हा पुन्हा देह प्राप्त करणे म्हणजे पुनरावृत्ति होय.  याला कारण – जीवाचे पाप-पुण्यात्मक कर्म-कर्तृत्व-भोक्तृत्व आणि अज्ञान हे आहे.  

ज्याप्रमाणे मोहरीचे झाड त्याचे बीज मागे ठेवून मरून जाते आणि पर्जन्यवृष्टि झाल्यानंतर पुन्हा उगवते, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव वर्तमान शरीराच्या मृत्यूपूर्वीच आपल्या नवीन कर्माचे बीज संस्काररूपाने पेरतो व ते पुढील शरीरासाठी कारण होते.  ज्ञानी पुरुष मात्र सर्व संसाराचे असलेले कारण अज्ञान आणि कर्तृत्व-भोक्तृत्व यांचा ज्ञानाने संपूर्ण निरास करून कर्मफलाच्या चक्रामधून मुक्त होतो.  याच शरीरामध्ये त्याने देहात्मबुद्धीचा निरास करून आत्मस्वरूपाची दृढ वृत्ति केलेली असते.  कारणनाशात् कार्यनाशः |  या न्यायाने पुनर्जन्माच्या असलेल्या बीजाचा, अज्ञानाचा ज्ञानाने संपूर्ण नाश झाल्यामुळे जन्ममृत्यूची कल्पनाच गळून पडते.  आत्मवित् शोकं तरति |  (छांदो. उप. ८-४-२) आत्मज्ञानी शोकसागराला पार करतो आणि याच शरीरामध्ये तो जीवनमुक्तावस्था प्राप्त करतो.  

याप्रमाणे जीवनमुक्त पुरुष प्रारब्धक्षय झाल्यानंतर वर्तमानकाळातील मिथ्या शरीराचा त्याग करून विदेहकैवल्यावस्था प्राप्त करतो.  म्हणजेच कारणाचा अभाव असल्यामुळे त्याला पुन्हा जन्म येत नाही तर उपाधीचा त्याग झाल्यानंतर निरुपाधिक परब्रह्मस्वरूपाने राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, June 12, 2018

तत्परायण | Stability in Practice


जरी सर्व चित्तवृत्ति ब्रह्मात्मस्वरूपामध्ये स्थिर, दृढ झाल्या तरी सुद्धा कधी कधी अन्य प्रयोजनाची अपेक्षा असल्यामुळे त्या निष्ठेमध्ये प्रतिबंध निर्माण होतात. याचे कारण ज्ञानी पुरुष सुद्धा शरीरयात्रेसाठी किंवा लोकसंग्रह करण्यासाठी अनेक प्रकारच्या बाह्य कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. त्यामुळे कळत-नकळत त्याची बहिर्मुख होण्याची शक्यता आहे. तसेच त्या मनामध्ये विषयसंगाने आणि जनसंपर्कामुळे चांगले-वाईट विचार किंवा प्रसंगामुळे मनाचा क्षोभ, संताप होऊन विक्षेप निर्माण होतात. त्याचे मन काही प्रमाणामध्ये अस्वस्थ व व्याकूळ होते. याचा परिणाम म्हणजे ब्रह्मनिष्ठेमध्ये काही प्रमाणात प्रतिबंध निर्माण होतात. ब्रह्मनिष्ठा असूनही परमशांति मिळत नाही.

म्हणून विद्वान पुरुषाने शरीराने कर्म करीत असताना सुद्धा आहारविहारादि सर्व व्यापारामध्ये बुद्धीने कर्मांचा किंवा विषयांचा आश्रय न घेता सतत ब्रह्मस्वरूपाचा आश्रय घ्यावा. म्हणजेच बाह्य वृत्तींचा निरास करून आत्मस्वरूपात स्थिर होण्याचा अभ्यास करावा. ‘मी’ आत्मा अकर्ता-अभोक्ता आहे हे जाणून साक्षित्वाचा अखंड अभ्यास करावा. तोच तत्परायण आहे.

या अभ्यासामुळे –
योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहिनः |
यस्य ब्रह्मणि रमते चित्तम् नन्दति नन्दति नन्दत्येव ||     (भजगोविन्दम् )
तो योगी योगाभ्यासामध्ये असो किंवा प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या भोगामध्ये असो, तसेच जनसंपर्कामध्ये असो किंवा जनसंपर्काचा त्याग करून एकांतामध्ये असो, त्याचे मन ब्रह्मस्वरूपामध्ये तन्मय झालेले असल्यामुळे तो सर्व प्रसंगामध्ये किंवा परिस्थितीमध्ये नित्य आनंदी, प्रसन्न असतो. तोच जीवनामधील खरा आनंद उपभोगतो. नव्हे, तर तोच आनंदस्वरूप होतो.

भगवान म्हणतात –
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः |
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ||  (गीता अ. ३-१७)
जो आत्म्यामध्ये रममाण झालेला असून आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट असतो, त्या यतीला कोणतेच कर्तव्य शिल्लक राहात नाही.
  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



  

                                                         - हरी ॐ

Tuesday, June 5, 2018

तन्निष्ठ | Stability in Conviction




घरामध्ये नादमधूर संगीत चालू असताना जर बाहेरून कर्णकर्कश आवाज आला तर त्या आवाजाच्या प्रभावाने सुरेल संगीताचा ध्वनि लुप्त झाल्यासारखा वाटतो.  किंवा सुगंधी अगरबत्ती पेटविल्यानंतर तिचा सुगंध घरात दरवळतो.  परंतु दुर्गंधाच्या प्रभावाने सुगंध लुप्त झाल्यासारखा वाटतो.  

त्याचप्रमाणे समाधिअवस्थेमध्ये ‘अहं ब्रह्मास्मि’ ही वृत्ति निर्माण होते आणि त्यामुळे साधकाला निरतिशय आनंदाचा अनुभव येतो.  परंतु समाधिअवस्थेमधून बाहेर आल्यानंतर देहाच्या संगाने देहतादात्म्य निर्माण होऊन ‘मी’ देह आहे ही वृत्ति पुन्हा प्रबल होते.  त्यामुळे समाधिअवस्थेमधील ‘मी’ ब्रह्म आहे हे ज्ञान लुप्त झाल्यासारखे वाटते.  तसेच निरतिशय आनंदाची अनुभूति सुद्धा नाहीशी होते आणि पूर्ववत मी मर्त्य आहे, मी सुखीदुःखी आहे या वृत्ति निर्माण होतात.  याचा अर्थ साधक स्वस्वरूपामध्ये दृढ झालेला नाही.  म्हणून साधकाने निष्ठा प्राप्त करण्यासाठी ब्रह्माभ्यास करावा.  

यासाठी आचार्य सांगतात – तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनम् |   (तृप्तिदीप)
सतत ब्रह्माकार वृत्तीचा अभ्यास करावा.  एकांतामध्ये बसून सर्व वृत्तींचा निरास करून सजातीय ब्रह्माकार वृत्ति निर्माण करावी.  तसेच अन्य साधकांबरोबर ब्रह्मस्वरूपाची चर्चा करून शंका निरसन कराव्यात आणि अज्ञानी मनुष्याच्या संगतीमध्ये त्याला आत्मस्वरूपाचे प्रबोधन करावे.  या सर्व अभ्यासाने सतत ब्रह्माकार वृत्ति निर्माण होते व हळूहळू सर्व संशय, विपार्याय निरास होऊन वृत्ति दृढ होते.  

याप्रमाणे बुद्धीची आत्मस्वरूपामध्ये निश्चलता प्राप्त होते.  अशी ज्यांची दृढ वृत्ति झालेली आहे ते तन्निष्ठ झालेले आहेत असे म्हटले आहे. 
श्रुति म्हणते – यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः  |   (दृक्दृश्यविवेक)
ज्या ज्या विषयाकडे मन जाते तेथेच त्याची समाधि असते.  म्हणजेच विषय पाहात असताना सुद्धा तो स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो.


  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ