Tuesday, February 13, 2018

शाखाचंद्रन्याय | “Branch-Moon” Methodology



स्थूल, प्राकृत बुद्धीच्या साधकांना जे दिसते, तेच सत्य वाटते.  विश्व, विषय, सर्व उपाधि, सर्व जीव, नानात्व-अनेकत्व हे सर्वच सत्य वाटत असल्यामुळे श्रुति परमात्म्याचे स्वरूप सांगत असताना सर्व निर्मिती गृहीत धरून त्या निर्मितीचे कारण परमात्मा आहे, असे सांगते.  म्हणजेच परमात्म्यामध्ये निर्मितीचा अध्यारोप करते.  यालाच “वाच्यार्थ” असे म्हणतात.  

शास्त्रामध्ये यासाठी “शाखाचंद्रन्याय” सांगितला जातो.  शाखाचंद्रन्याय म्हणजेच शाखेवरून चंद्राचे ज्ञान देणे होय.  आई लहान बालकाला चंद्र दाखविते.  ज्याला चंद्र माहीत नाही, त्या बालकाला आई अलौकिक पद्धतीने चंद्राचे ज्ञान देते.  विश्वामध्ये बालक नवीन आहे, त्याला सर्वच अपरिचित आहे.  अशा अज्ञानी बालकाला आई चंद्राचे ज्ञान देते.  मुलाला झाड माहीत आहे, फांदी माहीत आहे, गोल आकार माहीत आहे आणि पांढरा रंग माहीत आहे.  त्यामुळे आई त्या बालकाला सर्वप्रथम झाड दाखविते.  नंतर फांदी दाखविते.  नंतर त्या फांदीच्या पलीकडे असणारा मोठा पांढरा पूर्ण गोल दाखविते व नंतरच सांगते की, “अरे बाळा !  तो झाडामागील मोठा पांढरा गोल दिसतो आहे ना, तोच चंद्र आहे.”  हीच ज्ञान देण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.  

येथे जे माहीत आहे, ते गृहीत धरून त्याच्या साहाय्याने जे माहीत नाही अशा चंद्राचे ज्ञान दिले जाते.  यालाच ‘अध्यारोप’ म्हणतात आणि अपवादाच्या साहाय्याने लक्ष्यार्थ म्हणजेच उपाधीचा निरास करून त्याच्याही अतीत असणारे तत्त्व निर्देशित करणे होय.  निर्गुण, निर्विशेष, निर्विकार, कूटस्थ, असंग, साक्षी, चिद्रूप चैतन्य हाच ‘ईश’ शब्दाचा लक्ष्यार्थ आहे.  

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

No comments:

Post a Comment