Tuesday, February 27, 2018

आचारसंहितेचे महत्व | Importance of Behavior Guidelines




अध्यात्ममार्गात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही.  त्यासाठी क्रमानेच गेले पाहिजे.  प्रथम दीर्घकाळ स्वतःच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे निष्काम भावाने, निस्वार्थपणे कर्मानुष्ठान करावे.  जप, तपश्चर्या, श्रवण, मनन, ध्यान, समाधि या सर्व उच्च, उच्चतर साधना आहेत.  हे सर्व करण्यापूर्वी मनुष्याला प्रथम निःस्वार्थ जीवन जगता आले पाहिजे.  

श्री समर्थ रामदास सोप्या भाषेत सांगतात –
सदाचार हा थोर सांडू नये तो |  (मनोबोध)
जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे | जनी वंद्य ते सर्व भावे करावे ||  (मनोबोध)

म्हणून जीवन जगत असताना आचारसंहितेला परमोच्च स्थान आहे.  कसे जगावे, कसे बोलावे, कसे चालावे, कसे वर्तन करावे ?  यासाठी काही आचारधर्म आहेत.  ज्ञानाला, विद्वत्तेला आचारधर्मांची जोड नसेल तर ती विद्वत्ता डळमळीत व्हायला लागते.  ते ज्ञान मोक्याच्या वेळी धोका देते.  अशाच लोकांना समर्थ ‘पढतमूर्ख’ असे म्हणतात.  एखादा मनुष्य सुशिक्षित आहे, खूप ज्ञान आहे, जवळ खूप पदव्या आहेत, वक्तृत्वकलेमध्ये निष्णात आहे, परंतु अशा या ज्ञानाला चारित्र्याचा आधार नसेल तर ते पोकळ, शाब्दिक ज्ञान मनुष्याचे रक्षण करू शकत नाही.  

म्हणूनच श्रुति सांगते –
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः |  (महाभारत)
जो धर्माचा त्याग करतो, त्याचा नाश होतो आणि जो धर्माचे रक्षण करतो, त्याचेच रक्षण होते.  म्हणूनच आपल्या जीवनावर धर्माचा अंकुश पाहिजे.  धर्म हा आपल्या जीवनाचे अधिष्ठान आहे.  मानवी जीवनाचे सार आहे.  अन्य योनींच्यामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ सांगितले जातात.  परंतु फक्त मनुष्ययोनीमध्येच अर्थ आणि कामाबरोबरच धर्म आणि मोक्ष हे दोन पुरुषार्थ दिलेले आहेत.  धर्म म्हणजेच अत्यंत नियमित, चारित्र्यसंपन्न, सदाचारसंपन्न, नीतिनियमांनी युक्त असणारे जीवन !  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


                                                                      - हरी ॐ                 

Wednesday, February 21, 2018

साधु व इतरांतील फरक | What Makes a Saint Different?




जसे आपण व्यवहारामध्ये पाहतो की, गोटा नारळ आणि ओला नारळ दोन्हीही नारळच असतील तरी त्यामध्ये भेद आहे.  ओला नारळ करवंटीला आतून घट्ट चिकटलेला असतो.  याउलट गोटा नारळ करवंटीच्या आतच राहतो तरीही करवंटीपासून अत्यंत अलग, अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहतो. त्याचप्रमाणे ज्ञानी आणि अज्ञानी पुरुष यांच्या दृष्टीमध्ये भेद आहे.  

हाच साधु पुरुष आणि सामान्य पुरुष यामधील महत्वाचा भेद आहे.  सामान्य मनुष्य पुढे जातो, परंतु दुप्पट वेगाने त्याचे मन त्याला मागे खेचते.  याचे कारण त्याच्या मनामधील असंख्य वासना, कामना आणि ममत्व होय.  म्हणून कितीही साधना केली, शास्त्रावर नुसती पोकळ, विद्वत्ताप्रचुर चर्चा केली, तरी त्याला वैराग्याचा खरा अर्थ समजणे शक्य नाही.  म्हणून अज्ञानी गृहस्थाश्रमी पुरुषांना प्रयत्न करूनही त्याग किंवा संन्यास काय आहे ?  हे समजू शकणार नाही.  

जो साधु पुरुष आहे, ज्याने मनाने सर्वसंगपरित्याग केलेला आहे, तो वेळ आली तर सर्वकाही सोडून पुढे जाऊ शकतो. इतकी मनाची तयारी पाहिजे.  त्याचाच संन्यासामध्ये अधिकार आहे.  परंतु जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत शरीरधारणेसाठी काही विधि संन्याशाला सुद्धा आवश्यक आहेत.  

संन्यासी पुरुषाने स्वतःच्या शरीराच्या पोषण, वर्धन, रक्षणासाठी वस्त्र आणि भिक्षान्न वर्ज्य करू नये तर ते त्याने अन्य आश्रमाच्या लोकांच्याकडून ग्रहण करावे.  पण चुकून मागील जन्मांच्या संस्कारांच्यामुळे यदाकदाचित द्रव्य, विषयांचे उपभोग, ऐश्वर्य, वैभव, सत्ता, प्रसिद्धि, लोक किंवा त्याचप्रमाणे प्रियजनांबद्दल आसक्ति, ममत्व, स्नेह निर्माण झाला तर त्याचा विचारपूर्वक निःशेष त्याग करावा.   

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


                                                                      - हरी ॐ                 

Tuesday, February 13, 2018

शाखाचंद्रन्याय | “Branch-Moon” Methodology



स्थूल, प्राकृत बुद्धीच्या साधकांना जे दिसते, तेच सत्य वाटते.  विश्व, विषय, सर्व उपाधि, सर्व जीव, नानात्व-अनेकत्व हे सर्वच सत्य वाटत असल्यामुळे श्रुति परमात्म्याचे स्वरूप सांगत असताना सर्व निर्मिती गृहीत धरून त्या निर्मितीचे कारण परमात्मा आहे, असे सांगते.  म्हणजेच परमात्म्यामध्ये निर्मितीचा अध्यारोप करते.  यालाच “वाच्यार्थ” असे म्हणतात.  

शास्त्रामध्ये यासाठी “शाखाचंद्रन्याय” सांगितला जातो.  शाखाचंद्रन्याय म्हणजेच शाखेवरून चंद्राचे ज्ञान देणे होय.  आई लहान बालकाला चंद्र दाखविते.  ज्याला चंद्र माहीत नाही, त्या बालकाला आई अलौकिक पद्धतीने चंद्राचे ज्ञान देते.  विश्वामध्ये बालक नवीन आहे, त्याला सर्वच अपरिचित आहे.  अशा अज्ञानी बालकाला आई चंद्राचे ज्ञान देते.  मुलाला झाड माहीत आहे, फांदी माहीत आहे, गोल आकार माहीत आहे आणि पांढरा रंग माहीत आहे.  त्यामुळे आई त्या बालकाला सर्वप्रथम झाड दाखविते.  नंतर फांदी दाखविते.  नंतर त्या फांदीच्या पलीकडे असणारा मोठा पांढरा पूर्ण गोल दाखविते व नंतरच सांगते की, “अरे बाळा !  तो झाडामागील मोठा पांढरा गोल दिसतो आहे ना, तोच चंद्र आहे.”  हीच ज्ञान देण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.  

येथे जे माहीत आहे, ते गृहीत धरून त्याच्या साहाय्याने जे माहीत नाही अशा चंद्राचे ज्ञान दिले जाते.  यालाच ‘अध्यारोप’ म्हणतात आणि अपवादाच्या साहाय्याने लक्ष्यार्थ म्हणजेच उपाधीचा निरास करून त्याच्याही अतीत असणारे तत्त्व निर्देशित करणे होय.  निर्गुण, निर्विशेष, निर्विकार, कूटस्थ, असंग, साक्षी, चिद्रूप चैतन्य हाच ‘ईश’ शब्दाचा लक्ष्यार्थ आहे.  

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, February 6, 2018

मंगलाचरणाचे प्रयोजन - ३ | Necessity of Invocation Prayer - 3



मंगलाचरण करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे साधक या मार्गामध्ये तीव्र जिज्ञासेने श्रवण करायला लागतो.  तो प्रयत्न करतो, थोडीफार साधना करतो, सेवा करतो.  सुरुवातीला साधना आपल्या मनाप्रमाणे होते.  परंतु जसजशी मी अधिक साधना करायला लागतो, त्या त्या प्रमाणात बाहेरचे प्रतिबंध कमी होतात आणि आपले मन उफाळून बाहेर येते.  आपलेच मन आपल्याला प्रतिबंध करायला लागते.  साधक एका बाजूला शास्त्राचे श्रवण करीत असतो.  काळाच्या ओघात बाहेरची माणसेही त्याला अनुकूल होतात.  जे नातेवाईक त्याला विरोध करीत होते, तेही अनुकूल होतात.  बाहेरून कोणताही प्रतिबंध नसतो.  

प्रतिबंध असेल तर साधकाचे मनच त्याला साधना करू देत नाही.  त्याचे मन शास्त्राबद्दल, गुरूंच्याबद्दल, परंपरेबद्दल, साधनेबद्दल अनेक शंका निर्माण करते.  त्याच्या मनामध्ये अनेक विकल्प, भयंकर असणारे विचार येऊ लागतात आणि ते मन साधकाला नाचविते.  “मी जे करतो ते खरोखरच बरोबर आहे की चूक आहे ?  हे प्रगल्भ ज्ञान माझ्या अल्प बुद्धीला झेपेल का ?  मी खरोखरच या साधनेसाठी लायक आहे का ? ” असे एक नव्हे, दोन नव्हे, तर हजारो विकल्प मन निर्माण करते.  असे मन साधकाला सतत असुरक्षित भावना (insecured) निर्माण करून साधनेपासून परावृत्त करते.  मनामध्ये प्रचंड नैराश्य, वैफल्य (negative thinking) निर्माण करते.  त्यामुळे साधक असह्य, अगतिक होतो.  तो स्वतःच्या कर्तृत्वाने या सर्व विकल्पांच्यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो.  परंतु त्यामध्ये तो अयशस्वी ठरतो.  

अशा वेळी साधकाला या अवस्थेमधून बाहेर जर पडावयाचे असेल, तर त्यासाठी त्याने फक्त परमेश्वर, शास्त्र आणि गुरु यांचाच आधार घेतला पाहिजे.  यांच्याव्यतिरिक्त कोणीही त्याचा उद्धार करणार नाही.  बाहेरून त्याच्यासारखा शिकणारा एखादा पार्टनर, त्याचा एखादा नातेवाईक, सगे-सोयरे, आप्तेष्ट, त्याचा जीवश्च-कंठश्च मित्र सुद्धा त्याला त्या अवस्थेमधून बाहेर काढू शकत नाही.  त्याचवेळी साधक असह्य होऊन, अगतिक होऊन प्रार्थना करतो की, “भगवंता !  माझ्या मनाने माझ्यावर कृपा करावी.  परमेश्वरा !  तूच माझ्या मनामध्ये बदल कर आणि हे सर्व प्रतिबंध दूर कर.” यालाच “मंगलाचरण” अथवा “शांतिपाठ” असे म्हणतात.  

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ