भज
गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते | ‘भज’ याचा एक अर्थ म्हणजे निवडणे. तू गोविंदाला भज म्हणजे तू गोविंदाचीच निवड कर. विश्वामध्ये निवडण्यासाठी दोनच वस्तु आहेत. एक आहे विश्व व दुसरा आहे परमेश्वर ! या दोन्हींपैकीच काहीतरी एक निवडले पाहिजे. काय निवडावे ? याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तरीही इथे आचार्य सांगतात की, हे मनुष्या ! तू विश्व व क्षणिक विषय, भोग यांना
निवडण्यापेक्षा आनंदस्वरूप गोविंदालाच आयुष्यात निवड. त्यामध्येच तुझ्या जीवनाचे कल्याण आहे.
दोन
वस्तूंच्यामधून एक निवडणे हे बुद्धीचे कार्य आहे. मनुष्य बुद्धीने विचार करून सतत काहीतरी निवडत
असतो. विषय, भोग, यांचा
निवाडा करून त्यांची प्राप्ति करून उपभोगतो. पुन्हा त्या विश्वामधील विषयच निवडतो. परंतु वस्तुतः विश्वामध्ये विषय व परमेश्वर
अशा दोनच वस्तु आहेत. यांपैकी
सर्वसामान्यतेने सर्व जीव विषयांनाच महत्व देतात. आपण या दृश्य विश्व व विषयांना सत्य मानले आहे. त्यामुळे त्यांनाच महत्व देऊन विषयांची प्राप्ति
व विषयांचे येथेच्छ भोग घेणे, हेच आपले जीवन बनले आहे.
प्रत्येक
मनुष्य जन्माला येतो. जन्मल्यापासुनच
त्याच्या अवतीभोवती अनेक विषय व भोग त्याला दिसतात. विषयांच्या संगाने त्याच्या मनात विषयांच्याच अनंत
कामना निर्माण होतात. त्यामुळे तो या
विषयांनाच निवडतो. आयुष्यभर विषयांच्या
प्राप्तीसाठीच परिश्रम करीत राहतो. परंतु
दुर्दैवाने सर्व विषय मिळवून व भोगून सुद्धा त्याच्या मनाची शांति होत नाही. विषय सतत मनुष्याला अतृप्त, असमाधानीच ठेवतात.
विषयांच्या संगाने मनुष्याचे क्रमाने
अधःपतन होते. जितके विषय अधिक तितक्या प्रमाणात
क्षोभ, संताप, अपेक्षाभंग निर्माण होऊन मन उद्विग्न, अस्थिर होते.
म्हणूनच
भगवान अर्जुनाला आदेश देतात –
अनित्यमसुखं
लोकं इमं प्राप्य भजस्व माम् | (गीता अ.
९-३३)
हे
अर्जुना ! या अनित्य, दुःखयुक्त
मर्त्यलोकामध्ये जन्माला आल्यानंतर तू माझे – परमेश्वराचेच भजन कर.
- "भज
गोविंदम् |” या
परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Mataji Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st
Edition, April 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment