Tuesday, November 14, 2017

नवविधा भक्ति | Nine-Fold Devotion
श्रवण, कीर्तन, स्मरण, चरणसेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्यत्व व आत्मसमर्पण अशी नऊ प्रकारची भक्ति आहे.

यामध्ये परीक्षित राजासारखी श्रवणभक्ति असावी.  श्रवण करता-करताच त्याचे मन शुद्ध, विरक्त व ज्ञानसंपन्न होऊन त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होते.  दुसरी कीर्तनभक्ति आहे.  नारदमहर्षि, संत तुलसीदास यांच्यासारख्या अनेक संतांनी जीवनभर अखंडपणे नामसंकीर्तन करीत-करीत परमेश्वराची कृपा प्राप्त केली.  काया-वाचा-मनाने परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याचे जीवन कृतार्थ व परिपूर्ण झाले.  ध्रुव बाळभक्त प्रल्हाद हे स्मरणभक्तीची प्रसिद्ध उदाहरणे आहेत.  यांनी अखंडपणे भगवंताचे स्मरण केले.  हजारो जन्मांच्यामधील पापे भस्मसात करण्याचे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे.  फक्त हे नाम आवडीने, मनापासून घ्यावयास हवे.  

पादसेवन म्हणजेच चरणसेवा होय.  बंधु भरत हे चरणसेवेचे उत्तम उदाहरण आहे.  चरणसेवेच्या भावामध्ये मनामधील अहंकार-ममकारादि वृत्ति तसेच सर्व विकार आपोआपच संपतात.  साधक नम्र, विनयशील, नतमस्तक होतो.  राजा अंबरीष अर्चनसेवेने उद्धरून गेला.  अक्रूराने भगवंताची वंदनभक्ति केली.  मनोभावे वंदन करीत असल्यामुळे भगवंताने त्यास आपल्या दिव्य रूपाचे दर्शन दिले.

भक्त हनुमान, लक्ष्मण यांनी जीवनभर दास्यभक्ति केली.  परमेश्वर हा माझा स्वामी व मी त्याचा सेवक, या दास्यत्व भावामुळे त्यांनी अखंडपणे ईश्वराची सेवा केली.  पार्थ अर्जुनाने भगवंताची सख्यभावाने भक्ति केली.  व्रजामधील गोपींनी तर भगवंताच्या चरणी आत्मनिवेदन म्हणजेच स्वतःला समर्पित केले.  आपले संपूर्ण जीवन कृष्णमय करून सर्व कर्मेही भगवंतालाच अर्पण केली.  याप्रमाणे भक्तीचा भावच साधकाला परमोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जातो.  - "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015- हरी ॐ

No comments:

Post a Comment