Tuesday, November 21, 2017

संन्यास आणि निष्काम कर्मयोग | Renunciation & Dispassionate Actions



ज्यांनी गुरूगृही जावून श्रद्धा आणि भक्तीने आचार्यांची अनन्य भावाने सेवा केलेली नाही, अंतःकरणशुद्धि प्राप्त केलेली नाही आणि त्यामुळे वेदान्तशास्त्राचे सम्यक व यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त झालेले नाही, असे पारमार्थिक तत्त्व न जाणणारे अविद्वान लोक सर्वकर्मसंन्यास आणि निष्काम कर्मयोग हे दोन्हीही मार्ग भिन्न स्वरूपाचे आहेत असे म्हणतात.  एका मार्गामध्ये प्रवृत्ति आणि दुसऱ्या मार्गामध्ये सर्व कर्मांच्यामधून पूर्ण निवृत्ति आहे.  त्याचप्रमाणे कर्मयोग अविद्वान गृहस्थाश्रमी साधकांना दिलेला असून सर्वकर्मसंन्यास संन्यस्त वृत्तीच्या विद्वान पुरुषांना दिलेला आहे.  त्यामुळे दोघांचे फळही भिन्न स्वरूपाचे आहे.  दोन्हीही मार्गांमध्ये अधिकारीभेद, साधनभेद आणि फलभेद असल्यामुळे अविद्वान लोक हे दोन्हीही मार्ग भिन्न स्वरूपाने पाहातात.  

परंतु वेदान्तशास्त्राचे रहस्य जाणणारे पंडित लोक मात्र दोन्हीही मार्ग एकच आहेत असे म्हणतात.  चित्तशुद्धि हेच ज्ञानाचे साधन आहे आणि ही चित्तशुद्धि निष्काम कर्मयोगाचे व उपासनेचे फळ आहे.  श्रुतींच्यामधून प्रतिपादित केलेले ईश्वराचे माहात्म्य, महिमा, ईशनशीलत्व तसेच कर्म-कर्मफळाचे स्वरूप श्रवण करून साधक कर्म व उपासनेमध्ये प्रवृत्त होतो.  कर्म व उपासनेमधून ज्याचे चित्त शुद्ध झालेले आहे त्याच्या अंतःकरणामध्येच हे ज्ञान फलद्रूप होते.  ज्ञानयोग व कर्मयोग यामध्ये साध्य-साधनसंबंध आहे हे सिद्ध होते.  कर्मयोग हे साधन असून ज्ञानयोग हे साध्य आहे.  म्हणून ज्ञानाचे फल मोक्ष आहे व कर्मयोगाचेही फळ क्रमाने मोक्षप्राप्तीच आहे.  

कर्मयोगाची परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  म्हणून कर्मयोगनिष्ठा ही उपायनिष्ठा असून ज्ञानयोगनिष्ठा ही उपेयनिष्ठा आहे.  तसेच ज्ञानपूर्वक सर्वकर्मसंन्यासाचेही फळ ज्ञानप्राप्ति हेच आहे.  सर्व कर्तृकारादि प्रत्ययांचा निरास झाल्यावरच ज्ञानप्राप्ति होते.  सर्वकर्मसंन्यासाची परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  म्हणून सर्वकर्मसंन्यास हे साधन असून ज्ञाननिष्ठा हे साध्य आहे.  

याप्रकारे कर्मयोगनिष्ठा व सर्वकर्मसंन्यास या दोन्हींचीही परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  कर्मयोग व सर्वकर्मसंन्यास यामध्ये अधिकारीभेद, साधनभेद असले तरीही दोन्हीही मार्गांचे फळ मात्र एकच आहे.  म्हणून मुमुक्षु साधकाने आपल्या अधिकाराप्रमाणे कोणत्याही एका मार्गाचे सातत्याने दीर्घकाळ अनुष्ठान करून त्या मार्गामध्ये निष्ठा प्राप्त केली तर त्याला मोक्षप्राप्ति होते.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ –    

No comments:

Post a Comment