Monday, June 26, 2017

राज्यकर्त्यांना उपदेश | Learning for the Rulers



राजा सर्व समाजाचे किंबहुना मानवजातीचे रक्षण करतो.  लोककल्याणार्थ अविरत कार्य करतो.  त्यावेळी समाजाचे खरे कल्याण कशामध्ये आहे, हे राजाला निश्चितपणे समजले पाहिजे.  सामान्यतेने भौतिक समृद्धि, सांपत्तिक सुस्थिति आणि विषयांची भरभराट यामध्येच मानवजातीचे कल्याण आहे, असे म्हटले जाते.

परंतु हे करीत असताना मनुष्याची दृष्टि फक्त ऐहिक आणि विषयांची प्राप्ति हीच झाली तर तो मनुष्य अर्थ आणि कामनेने प्रेरित होवून कामांध होईल.  तो विषयासक्त होवून विषयप्राप्ति व विषयभोग हाच त्याच्या जीवनाचा परमपुरुषार्थ होईल.  यामुळे तो आपोआपच श्रेष्ठ नीतिमूल्ये, जीवनमूल्ये तसेच, सदाचार, संयमन, सद्गुणांची जोपासना, कर्तव्यपारायणता या सर्वांना झुगारून देवून स्वतःच्या कामनापूर्तीसाठी अनीति आणि अनाचाराचे अनुसरण करेल.  तो अत्यंत स्वैर, उच्छ्रुंखल, पशुतुल्य होईल.  त्यामुळे मनुष्यामधील माणुसकीचा ऱ्हास होईल.

हे समाजाच्या आणि मानवजातीच्या दृष्टीने योग्य होणार नाही.  म्हणून समाजपरिपालक असणाऱ्या राजे लोकांना किंबहुना सामाजिक कार्यकर्त्यांना जीवनाची खरी दृष्टि काय आहे, हे कळणे अत्यंत आवश्यक आहे.  नीतिमूल्यांचा त्याग करून केवळ भौतिक समृद्धि केली तर तीच समृद्धि समाजाच्या नाशाचे कारण होईल आणि संसारामधून मुक्त होण्यासाठी आत्मचिंतन हेच ध्येय आहे, असे जर सांगितले तर मनुष्य सर्व कर्तव्यकर्मांचा त्याग करून निष्क्रिय होईल.  त्याची कर्म न करण्याकडे प्रवृत्ति वाढेल.  यामुळेही समाजाचा उत्कर्ष आणि सुस्थिति होणार नाही.

म्हणून या दोन्हीही मार्गांचा योग्य तो समन्वय होणे आवश्यक आहे.  जीवनाचे खरे कल्याण लक्षात घेऊन आत्मोन्नति करून घेण्यासाठी कर्मयोगनिष्ठेची आवश्यकता आहे.  तसेच, जीवनामध्ये संयमन, सदाचार, श्रेष्ठ नीतिमूल्यांची जोपासना आणि उदात्त, शुद्ध विचारांसाठी विवेकाची आवश्यकता आहे.  ही दृष्टि आणि दिशा देण्यासाठी राज्यकर्त्यांना या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे.  



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment