Tuesday, April 25, 2017

रामायण – जीवनामधील युद्ध | Ramayana – War in Our Life


श्रीराम आणि रावण यांच्यामधील युध्द हे केवळ दोन व्यक्तींच्यामधील युद्ध नाही.  तर श्रीराम आणि रावण म्हणजेच दैवीगुणसंपत्ति आणि आसुरीगुणसंपत्ति या दोन भिन्न-भिन्न प्रवृत्ति आहेत.  म्हणूनच श्रीराम आणि रावण यांचे युद्ध म्हणजे या विश्वामध्ये असणारा धर्म आणि अधर्म यांच्यामधील युद्ध होय.  

त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये आपल्याच अंतरंगामध्ये आपण जर पाहिले, तर युद्ध हे बाहेर नाही, तर ते आपल्याच आत आहे.  आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सात्विकप्रवृत्ति म्हणजेच दैवीगुणसंपत्ति आणि सतत क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येणारे विकार, आसुरीगुणसंपत्ति यांच्यामध्ये सतत युद्ध, संघर्ष चालू आहे.  जीवनभर रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला हा अंतरिक संघर्ष प्रत्येक मनुष्य अनुभवतो.  

युद्धामध्ये धर्माच्या - श्रीरामाच्या पक्षामध्ये वानरे आहेत आणि रावणाच्या पक्षामध्ये आसुर आहेत. वानरे म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सर्व सात्विक वृत्ति आहेत.  अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, सहनशीलता, ऋजुता, गुरुसेवा, शुद्धि, स्थिरता, आत्मनिग्रह, स्वाध्याय, विवेक, वैराग्य, शम-दम-उपरति-तितिक्षा-श्रद्धा-समाधान, मुमुक्षुत्व, भक्ति, सेवा, निष्ठा, समर्पण असे हे अनंत दैवी गुण आहेत.  तीच जणु काही श्रीरामाच्या पक्षामधील वानरे आहेत.  या वानरांचा प्रमुख म्हणजेच सर्वश्रेष्ठ भक्त हनुमान आहे.  म्हणून भक्ति हीच सर्व दैवी गुणांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे.  भक्तिमधूनच अन्य सर्व दैवी गुण उदयाला येतात.  जेथे भक्ति आहे, तेथेच सेवा आहे.  त्याठिकाणीच शमदमादि संपत्ति आहे.  तेथेच विवेक-वैराग्य या सर्व दैवी गुणांचा आविष्कार आपल्याला दिसतो.  

अनादि काळापासून हे धर्मयुध्द चालूच आहे.  आस्तिक-नास्तिक, धर्म-अधर्म, नीति-अनीति, सदाचार-दुराचार, न्याय-अन्याय, सत्य-असत्य यांच्यामधील हे युद्ध आहे.  या युद्धाचा निर्णय एकच – आणि तो म्हणजे धर्माचा, नीतीचा, सदाचाराचा, न्यायाचा व सत्याचा विजय होय.  


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007




- हरी ॐ

Tuesday, April 18, 2017

रामायण – सदसद्विवेकबुद्धी | Ramayana – Power of Discrimination


जानकीपति श्रीराम जेव्हा युद्धाचा निर्णय घेतात, तेव्हा राजनीतीप्रमाणे रावणास शेवटची संधी म्हणून युद्धापासून परावृत्त करण्यासाठी आपल्या पक्षातर्फे अंगदाला रावणाच्या सभेमध्ये पाठवितात.  परंतु अहंकाराची मूर्ति असणारा रावण कोणत्याही प्रकारे तडजोड करण्यास तयार होत नाही.  रावणाला त्याची धर्मपत्नी मंदोदरी सुद्धा अनेक प्रकारे युद्धाचे दुष्परिणाम सांगून रावणाचे मन वळविण्याचा प्रयत्न करते.  जरी मंदोदरी रावणाची धर्मपत्नी असून त्याच्या अत्यंत निकट राहत असते, तरी सुद्धा तिला निश्चितपणे योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, नीति-अनीति, न्याय-अन्याय याचे स्पष्ट ज्ञान असते.  मंदोदरी हे आपल्या जीवनामधील सदसद्विवेकबुद्धीचे प्रतीक आहे.  

जीवनामध्ये पुष्कळ वेळेला मनुष्य विकारवश होतो.  विषयवासनांच्या, कामनांच्या, भावनांच्या आहारी जाऊन स्वैर व उच्छृंखल जीवन जगतो.  मन मानेल त्याप्रमाणे वागतो.  परंतु त्यावेळी सतत मनुष्याची बुद्धीच मनुष्याला पावलोपावली योग्य-अयोग्य सांगत असते.  म्हणून तरी आपण मराठीमध्ये पुष्कळ वेळेला म्हणतो – “समजतं पण उमजत नाही !”  मी जे करतो, ते अयोग्य आहे, असे बुद्धीने सांगूनही मन ऐकत नाही.  आपण मनाच्या भावनांचे गुलाम होऊन वाममार्गामध्ये प्रवृत्त होतो.  अशा स्वैर, अनियंत्रित प्रवृत्तीमुळेच मनुष्याचा नाश होतो.  

संत तुलसीदास मंदोदरी व रावणाच्या संवादाचे वर्णन करतात –
अस बिचारि सुनु प्रानपति प्रभु सब बयरु बिहाइ |
प्रीति करहु रघुबीर पद मम अहिवात न जाइ ||
“हे प्राणनाथा !  विचार करून, प्रभूशी वैर सोडून युद्धाचा निर्णय त्याग करावा.  श्रीरघुवीराच्या चरणकमलांवर प्रीति करावी.  त्यामुळे माझे सौभाग्यलेणे अखंड राहील.”  

याप्रकारे मंदोदरी, ही सदसद्विवेकबुद्धि रावणास म्हणजेच उन्मत्त जीवास समजावून देते.  जीवनामध्ये श्रेयस्कर, हितावह सल्ला देते.  


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



- हरी ॐ – 

Tuesday, April 11, 2017

रामायण – भक्तीचा दिलासा | Ramayana – Devotion Gives Hope


रावणाच्या कडक पहाऱ्यामध्ये असताना सुद्धा श्रीरामाचा परमदूत व परमभक्त असणारा हनुमान लंकेमध्ये प्रकट होतो आणि सीतेला भेटतो.  हनुमान सांगतो, की “ हे माते !  मी प्रभु श्रीरामांचा दूत आहे.  आणि तुझ्याचसाठी त्यांनी मला येथे पाठवलेले आहे ”.  राक्षसांच्या पहाऱ्यामध्ये असणारी सीता सहजासहजी त्यावर विश्वास ठेवीत नाही.  त्यावेळी हनुमान सीतेला श्रीरामाची ओळख म्हणून श्रीरामाच्या करकमलामधील मुद्रिका दाखवितो.  सीतेच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटते.  क्षणभर ती आपले सर्व दुःख विसरते.  हा हनुमान निश्चितपणे माझ्याच श्रीरामाचा परमदूत आहे, असे तिला मनोमन पटते.  श्रीरामाच्या केवळ स्मरणानेच ती हर्षित होते.  आपली या पहाऱ्यामधून निश्चित मुक्तता होणार, याची जाणीव ही तिला अंतःकरणामध्ये होते.  हनुमान त्या अवस्थेमध्ये सीतेला आधार देतो.  आश्रय देतो.  

हनुमान म्हणजेच मूर्तिमंत भक्ति ! भक्तीच साधकाला परमेश्वराची ओळख करवून देते.  आपल्याही जीवनामध्ये हनुमानाप्रमाणे परमेश्वराबद्दल भक्ति उदयाला येते. हनुमानाचे फार सुंदर वर्णन केले जाते –
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् |
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ||  

असा हा वायुपुत्र असणारा हनुमान शक्ति-युक्ति-बुद्धि-सेवा, श्रद्धा, भक्ति अशा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या दैवीगुणसंपत्तीचे असणारे आश्रयस्थान आहे. इतकेच नव्हे, तर सर्व बुद्धिमान पुरुषांच्यामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ असून जितेंद्रिय म्हणजेच त्याचे सर्व इंद्रियांच्यावर पूर्णतः नियमन आहे.  तो वायुपुत्र असून सर्व वानरांचा मुख्य असणारा आणि श्रीरामचंद्रांचा प्रमुख सेवक व परमदूत असणारा असा हा हनुमान सीतेच्या जीवनामध्ये येतो.

त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये हनुमान येणे म्हणजेच जीवनामध्ये भक्ति, श्रद्धा, शक्ति, युक्ति, बुद्धि या सर्व प्रकारच्या दैवी गुणसंपत्तीचा आविष्कार होणे होय.  म्हणून तरी हा जीव ज्या प्रमाणामध्ये परमेश्वराचे नामस्मरण करेल, अत्यंत व्याकूळ, तन्मय, तल्लीन, तद्रूप होईल, त्यावेळी भगवंताविषयी श्रद्धेचा, भक्तीचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये उदयाला येईल.  


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



 हरी ॐ