Tuesday, February 2, 2016

ज्ञान हेच संन्यासाचे लक्षण | Knowledge – The Mark of Renunciationआत्मस्वरूपाच्या ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होऊन त्यातून निर्माण झालेला कर्तृत्व- भोक्तृत्वाचा अध्यास, त्याचप्रमाणे कर्ता-कर्म-क्रिया-करण-कारकादि प्रत्ययांचा आणि देहात्मबुद्धीचा निरास झाल्यामुळे आपोआपच सर्व कर्म आणि कर्मफळ तसेच संसाराचा अत्यंत अभाव होतो.  ज्ञानामुळे कर्तृत्वाचा अभाव झाल्यामुळे शास्त्र त्या विद्वान पुरुषाला कोणत्याही कर्माचा आदेश देऊ शकत नाही, कारण आदेश देण्यासाठी किंवा विधि-निषेध देण्यासाठी कर्त्याची आवश्यकता असते.

सर्व आदेश जीवाच्या मनात चोदना-प्रवृत्ति निर्माण करून काही कर्मामध्ये प्रवृत्त करतात. तर काही कर्मापासून निवृत्त करतात.  अशी विधि-निषेधपर वचने आहेत.  हे सर्व आदेश कर्त्याला केंद्रीभूत ठेवून केलेले आहेत.  त्यामुळे त्यामागे कर्तृत्व-भोक्तृत्वाचा अध्यास आणि अज्ञान हे गृहीत आहे.

परंतु आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे ज्याला ‘मी’ अकर्ता-अभोक्ता आहे, असे ज्ञान झाले आहे त्याला कोणताही विधि-निषेधपर आदेश संभवत नाही.  ज्ञान हे अकर्तृ-अभोक्तृ स्वरूपाचे आहे.  त्यामुळे तो कर्म संन्यासाला अधिकारी होतो.  नव्हे, तोच फक्त सर्वकर्मसंन्यासी आहे.  म्हणून म्हटले आहे ज्ञानं संन्यासलक्षणम् |  ज्ञान हेच संन्यासाचे लक्षण आहे. जो ज्ञानी तोच संन्यासी आणि जो संन्यासी तोच ज्ञानी होय.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ||        ( गीता. अ. ५-२३ )

मनाने सर्व कर्मांचा संन्यास घेऊन नवद्वाररूपी देहामध्ये काहीही न करता आणि करविता हा आत्मसंयमी पुरुष अनायासाने स्वस्वरूपामध्ये राहतो.  यावरून सिद्ध होते की, ज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारचे कर्म शक्य नाही.  तसेच त्याला कोणताही विधि-निषेध नाही.  म्हणून हा संन्यास शरीराचा किंवा कर्माचा नसून ‘ज्ञान’ हेच संन्यासाचे लक्षण आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

No comments:

Post a Comment