आपण
व्यवहारात अनेक वेळेला संसार हा शब्द वापरतो. अनेक लोक म्हणतात की, आम्हाला अध्यात्म करण्याची
खूप इच्छा आहे हो ! पण काय करणार ? आमच्या मागे संसार लागलाय ! मुलं, बाळं, पती, पत्नी, सगे-सोयरे, घर-दार
यासारख्या सर्व गोष्टींना मिळून संसार अशी संज्ञा दिली जाते. परंतु शास्त्राप्रमाणे याला ‘संसार’ म्हणत नाहीत.
आचार्य
आपल्या भाष्यांच्यामधून ‘संसार’ या शब्दाची व्याख्या करतात –
कर्तृत्वभोक्तृत्वलक्षणः संसारः | ज्यामध्ये
मी केले किंवा मी कर्ता व मी सुखदुःखांचा भोक्ता असा कर्तृत्व – भोक्तृत्व भाव
असतो त्यास ‘संसार’ असे म्हणतात. किंवा
दुसरी व्याख्या आहे – अहंताममतालक्षणः संसारः | ज्यामध्ये अहंकार व ममकार या दोन वृत्ति
असतात, त्यास ‘संसार’ असे म्हणतात.
मी व
माझे या दोनच वृत्ति मनुष्याच्या संसारबंधनाला कारण आहेत. मी ही अभिमानाची व माझे ही ममत्वाची वृत्ति आहे. उदा. सोन्याचा दागिना जोपर्यंत
सोनाराच्या दुकानात असतो तोपर्यंत आपल्याला त्रास नसतो. परंतु ज्याक्षणी आपण पैसे
देऊन दागिना विकत घेतो, तेव्हा त्यामध्ये हा माझा दागिना, अशी ममत्वाची भावना
निर्माण होते. यालाच संसार असे म्हणतात. माझे घर, माझी मुलं, माझी पत्नी, माझे शरीर,
माझे मन याप्रमाणे सर्व ठिकाणी ममत्वाची वृत्ति निर्माण करून त्यामध्ये आपण आसक्त
होतो. यालाच ‘संसार’ असे म्हणतात.
म्हणून
संसार हा वस्तुतः बाहेर नसून मनुष्याच्या मनामध्ये संसार आहे. जोपर्यंत मन आहे, तोपर्यंतच संसार
आहे, कारण मनच लयावस्थेला गेले तर तेथे संसाराचा अभाव होतो. आचार्य म्हणतात – चित्तमेव हि संसारः | मन म्हणजेच संसार आहे. आचार्य संसाराचे वर्णन
करतात – अनेकानर्थसंकुलः | अनेक अनर्थांचे
संकुल असणारा ‘संसार’ आहे. संकुल म्हणजे
समूह होय. त्याप्रमाणेच, जेथे सर्व
बाजूंनी अनर्थच अनर्थ घडत असतात, त्यास ‘संसार’ असे नाव आहे.
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
महाशिवरात्री २०१३
- Reference: "Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
- Reference: "Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment