षट्पदी स्तोत्रामध्ये आचार्य सुंदर प्रार्थना करतात – अविनयं
अपनय विष्णो | भगवंता
! माझ्यामधील अविनय दूर कर.
मानवी
मनामधील सर्व संघर्ष अभिमानाच्या वृत्तीमुळे निर्माण होतो. अभिमानाने मी स्वतःच माझ्या
स्वतःभोवती अनेक कल्पनांचे जंजाळ निर्माण केले आहे. त्या कल्पनांच्यामध्येच मी जीवन जगतो. माझे शरीर बाह्य विश्वात आहे. परंतु ‘मी’ मात्र माझ्या मनोकल्पित विश्वामध्ये
जगतो. मी माझं स्वतःचं स्वतंत्र
मनोविश्व निर्माण करतो. त्यामध्ये
स्वतःविषयी तर अनंत कल्पना आहेतच. परंतु
मी जगत असताना अन्य व्यक्तींच्याबद्दल सुद्धा कल्पना करतो. विश्वाबद्दल विषयांच्याबद्दल कल्पना करतो.
इतकेच
नव्हे तर, दुसऱ्या व्यक्तीने कसे वागावे ? हे मी ठरवितो. मी असं बोलल्यावर समोरच्या व्यक्तीनं मला कसं
प्रत्युत्तर द्यावं, माझ्याकडं त्यानं कसं पाहावं ? कसं बोलावं ? कसं हसावं ? कशी प्रतिक्रिया द्यावी ? हे मी ठरवितो आणि त्याप्रमाणं घडलं नाही तर आपण
दुःखी होतो. म्हणुनच व्यवहारामध्ये
क्षणाक्षणाला आपला अपेक्षाभंग होत असतो. आपल्या
अपेक्षेप्रमाणे विश्वामधील एकही व्यक्ति वागत नाही. मग मात्र आपले जीवन असह्य होते.
याप्रमाणे
जितका अविनय अधिक तितक्या कल्पना वर्धन पावतात. जितक्या कल्पना अधिक तितक्या अपेक्षा अधिक व
जितक्या अपेक्षा अधिक तितका अपेक्षाभंग अधिक होतो. याचा अर्थच मनुष्याच्या सर्व दुःखांचे, असह्य
वेदनांचे, त्यास अनुभवायला येणाऱ्या संसाराचे मूळ कारण अहंकार हेच आहे. म्हणुनच आचार्य प्रामुख्याने प्रार्थना
अहंकाराच्या नाशासाठी करीत आहेत.
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
महाशिवरात्री २०१३
- Reference: "Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
- Reference: "Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment