Friday, October 24, 2014

तीन ऋणं | Three Debts




कर्माचे रहस्य न जाणता मनुष्य सर्व कर्मसिद्धीचे कर्तृत्व अहंकारामुळे आपल्याकडेच घेतो.  देवांच्या कृपेमुळे मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय त्यांना न देता स्वार्थाने प्रेरित होवून स्वतःकडेच घेतो.  आणि स्वतःच्या सुखासाठीच त्या फळाचा उपभोग घेतो.  त्यांच्या कृपेने आपली समृद्धि आणि भरभराट होत आहे.  यात माझे स्वतःचे कर्तृत्व नाही, याची जाणीव ठेवणे म्हणजेच देवांचे ऋणी होणे होय.
 

प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन प्रकारची ऋणं आहेत.  १) देवण,  २) षिण,  ३) पितृण. ही तीन ऋणं पूर्ण न करता स्वशरीरपोषणासाठी, इंद्रियभोगासाठी जो सर्व भोग स्वार्थाने, कामुकतेने भोगतो तो सर्व देवांचा चोर आहे.  तो श्रेष्ठ लोकांच्यामध्ये निंद्य होतो.


देवऋण – हे फेडण्यासाठी देवांना साधनभूत असणारे श्रौतस्मार्तादि, यज्ञयागादि कर्म करून त्यामध्ये त्या त्या देवतांच्यासाठी आहुती अर्पण करून देवांना संतुष्ट करावे.

 
षि – हे पूर्ण करण्यासाठी ब्रह्मचर्य वृत्तीने सर्व इंद्रियांच्यावर आणि उपभोगांवर संयमन करून नियमित, विवेकी जीवन जगावे.  आचार, विचार आणि उच्चाराने चारित्र्यसंपन्न जीवन जगावे. समर्थ म्हणतात –
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनी तोचि तो मानवी धन्य होतो || (मनोबोध)

पितृ – प्रजोत्पत्ति करून हे फेडावे.  श्राद्धपिंडादि तर्पण करून पितरांना संतुष्ट करावे.

जो ही ऋणे न फेडता स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो तो चोरच आहे.  चोर कोण आहे ?  दुसऱ्याच्या मालकीची वस्तु स्वतःचीच आहे असे समजून जो त्यावर मालकी हक्क दाखवितो आणि स्वतःसाठी उपभोगतो तोच खरा चोर आहे.  आपल्याला जे काही मिळालेले आहे ते खरोखर कोणाच्या मालकीचे आहे ?  हे स्वकर्तृत्वाने मिळालेले आहे का ?  याचा विचार मनुष्य कधीही करीत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

- हरी ॐ

No comments:

Post a Comment