Tuesday, October 14, 2014

कर्मबंधन | Bondage of Actions


लौकिक आणि व्यावहारिक कर्म असो किंवा शास्त्रप्रतिपादित कर्म असो, ते जर मनुष्याने कामनेने प्रेरित होवून आणि कर्मफळाच्या अपेक्षेने केलेले असेल तर ते कर्म व्यावहारिक दृष्टीने कितीही चांगले असले तरी बंधनकारक होते.  कसे ?

कोणतेही कर्म कामनेने प्रेरित होवून केले असता त्यामध्ये आपोआपच कर्मफळाची अपेक्षा निर्माण होते.  ते फळ किती असावे, कसे असावे, केव्हा मिळावे याची सर्व कल्पना मनुष्य आपल्या मनामध्ये निश्चित करून ठेवतो आणि ज्यावेळी त्या कर्मानुसार फळ मिळते त्यावेळी मनुष्य ते फळ जसेच्या तसे न स्वीकारता त्याने केलेल्या कल्पनेमधून किंवा अपेक्षेमधून बघत असतो.  त्यामुळे मनामध्ये साहाजिकच दोन प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण होतात.  ते फळ त्याच्या अपेक्षेप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे असेल तर सुखकारक, आनंदवर्धन करणारी वृत्ति निर्माण होते आणि जर ते फळ अपेक्षेपेक्षा कमी अथवा अपेक्षेच्या विरुद्ध असेल तर ते दुखःवर्धन करणारे होते.

दुर्दैवाने आपल्या मनाप्रमाणे काहीच घडत नसते.  अगदी झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत अपेक्षाभंगच होत असतात.  याचे कारण आपण विश्वावर, कर्मावर, तसेच कर्मफळावर नियमन करू शकत नाही.  इतकेच नव्हे तर, मी माझ्यावरही नियमन करू शकत नाही.  त्यामुळे कर्म तेच असेल आणि कर्माचे फळही एकच असेल तरीसुद्धा मी ते माझ्या अपेक्षेमधून पाहिल्यामुळे मनामध्ये उद्विग्नता, द्वंद्व, वैफल्य, नैराश्य निर्माण होते.  हेच कर्मबंधन होय.

प्रत्यक्षात कर्म किंवा कर्मफळ मनुष्याला कधीही बद्ध करीत नाही.  तर त्यामागील अपेक्षा बद्ध करणारी आहे.  यामुळे मनात सतत रागद्वेषादि प्रतिक्रिया निर्माण होवून मनाचे संतुलन किंवा मनाचा तोल जातो.  जितक्या अपेक्षा अधिक तितके विक्षेप अधिक !  जितक्या प्रतिक्रिया अधिक तितके नैराश्य, द्वंद्व अधिक निर्माण होते आणि कर्मबंधन अधिक दृढ होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment