मनुष्याने
देवतांना संतुष्ट केले तर त्या देवता प्रसन्न होवून मनुष्याला सर्व प्रकारचे उपभोग
देवून संतुष्ट करतील. याप्रमाणे एकमेकांना
संतुष्ट करून मनुष्याने जीवन जगत रहावे. विश्व म्हणजेच निसर्ग. विश्वामधील निसर्गाची शक्ति आणि मनुष्य
यामध्ये सुसूत्रता आणि सुसंगति निर्माण झाली तरच हे विश्वचक्र नियमाने चालेल.
जर
मनुष्य मन मानेल त्याप्रमाणे स्वैर, उच्छृंखल, दुराचारी बनून त्याचे जीवन स्वार्थ
आणि लोलुपतेने बरबटलेले असेल तर तोच स्वतः स्वतःच्या पुरुषार्थाने विश्वचक्रामध्ये
प्रतिबंध निर्माण करतो. त्यामुळे निसर्गाचे नियम सुव्यवस्थित कार्य
करणार नाहीत. याला जबाबदार ईश्वर, निसर्ग
किंवा विश्व नाही. तर मनुष्यच पूर्णतः
जबाबदार आहे. विश्वामधील सर्व प्रश्न
मनुष्यनिर्मितच आहेत. तो स्वार्थाने आणि
अहंकाराने विश्वामध्ये विसंगति निर्माण करीत आहे. म्हणून येथे म्हटले आहे – परस्परं भावयन्तः |
मनुष्याने
ईश्वरासाठी जगावे आणि त्याची परतफेड म्हणून परमेश्वर मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण
करेल, कारण सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मनुष्यामध्ये नाही. जोपर्यंत विश्वातील शक्ति मनुष्याला अनुकूल
होत नाही तोपर्यंत त्याला कधीही यश किंवा ईप्सित फळ प्राप्त होणार नाही. म्हणून मनुष्य आणि देवांची शक्ति यांनी
परस्परांना अनुकूल होणे आवश्यक आहे.
म्हणून
मनुष्याचे जीवन हे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा केवळ कामनापूर्तीसाठी नसून
मनुष्य आणि विश्व यामध्ये एक प्रकारचा समन्वय व सुसंगति निर्माण करण्यासाठी आहे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment