Tuesday, September 16, 2014

अनुसरण कर्मयोगाचे की ज्ञानमार्गाचे ? | Path of Action or Knowledge ?



कर्मांचा आरंभ न करता मनुष्याला नैष्कर्म्यावस्था प्राप्त होत नाही.  तसेच, कर्मांचा केवळ त्याग केल्याने सुद्धा आत्मसिद्धि प्राप्त होत नाही. 

रागद्वेषात्मक पापांचा क्षय कर्माच्या अनुष्ठानाशिवाय होत नाही.  पापांचा क्षय झाल्याशिवाय चित्तशुद्धि नाही.  चित्तशुद्धीशिवाय मनाची एकाग्रता होत नाही आणि त्याशिवाय ज्ञानोदय व ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  ज्ञाननिष्ठा म्हणजेच नैष्कर्म्यावस्था होय.  थोडक्यात ज्ञाननिष्ठेसाठी चित्तशुद्धि, चित्तशुद्धीसाठी पापक्षय आणि पापक्षयासाठी कर्म अनुष्ठान हा क्रमाने हेतु आहे.  कर्म हे जरी मोक्षाचे साक्षात साधन नसले तरी सुद्धा अंतःकरणशुद्धीद्वारा ज्ञानप्राप्तीसाठी पूरक, साहाय्यकारी साधन आहे.

अर्जुन किंवा कोणताही साधक जर म्हणेल की मी अखंड श्रवण-मननादि साधना करून ज्ञाननिष्ठा प्राप्त करेन, तर भगवान म्हणतात की , हे अर्जुना !  तू जरी मुमुक्षु असशील तरी ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी चित्तशुद्धि व विरक्त मन तुला प्राप्त झालेले नाही.  त्यामुळे हट्टाने तू कर्मसंन्यास घेतलास तर नैष्कर्म्यावस्था तर मिळणारच नाही.  याउलट पापक्षय सुद्धा होणार नाही. कर्मानुष्ठानाशिवाय चित्तशुद्धि कशी मिळेल ?  म्हणून नैष्कर्म्यावस्था प्राप्त करण्यामध्ये कर्माचे ज्ञानाइतकेच महत्व आहे.  शास्त्रामध्ये सुद्धा चित्तशुद्धि हेच कर्माचे प्रयोजन सांगितलेले आहे.

अज्ञानी पुरुषाने कर्मसंन्यास न घेता निष्काम वृत्तीने कर्माचे अनुष्ठान करावे, कारण कर्मफळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म ज्ञानप्राप्तीसाठी साहाय्यकारी साधन होते.  त्यामुळे हे अर्जुना !  तू कर्मयोगाचे अनुसरण करावयाचे की ज्ञानमार्गाचे ?  हा प्रश्नच उद्भवत नाही कर्मयोगनिष्ठेशिवाय चित्तशुद्धि नाही आणि चित्तशुद्धीशिवाय ज्ञाननिष्ठा कधीही प्राप्त होत नाही.  म्हणून प्रत्येक साधकाने चित्तशुद्धीसाठी कर्मयोगाचे अनुष्ठान करावे, हाच भगवंताचा अभिप्राय आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment