Tuesday, April 8, 2014

मनाच्या वृत्ति | Components of Mind



मनाचे अधिक निरीक्षण केले तर आपल्याला चार प्रकारच्या वृत्ति दिसतात –  

मनज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये दोन परस्पर–विरुद्ध विचार येऊन द्वंद्व निर्माण होते, गोंधळलेली अवस्था निर्माण होते किंवा संशयात्मक वृत्ति निर्माण होते त्या अवस्थेला ‘मन’ म्हटले जाते.  या अवस्थेमध्ये चांगले-वाईट, योग्य-अयोग्य किंवा खरे-खोटे, कर्तव्य-अकर्तव्य वगैरे कोणत्याही प्रकारचा निश्चित निर्णय घेता येत नाही. 

बुद्धि – अंतःकरणाची विचार करण्याची शक्ति (विवेकशक्ति - faculty of discrimination) संशयात्मक असलेल्या दोन्ही विषयांमध्ये साधक-बाधक विचार करून त्यांचे स्वरूप जाणून घेऊन एका निश्चित निर्णयापर्यंत येते.  अंतःकरणाच्या निर्णयात्मक वृत्तीला बुद्धि असे म्हणतात.  या वृत्तीमध्ये मनातील द्वंद्व, संशय, भ्रम किंवा गोंधळ नाहीसे होतात.  याच विवेकाने निर्माण होणाऱ्या निर्णयात्मक वृत्तीमुळे दृढ व नि:संशय ज्ञान प्राप्त होते.  

चित्त – अनेक प्रकारच्या विषयांचे किंवा प्रसंगाचे अनुभव अंतःकरणावर संस्काररूपाने ठसा निर्माण करून नाहीसे होतात.  यामुळे आत्तापर्यंतचे सर्व प्रसंग आणि चांगले वाईट अनुभव आपण संस्काररूपाने अंतःकरणामध्ये संग्रह केलेले आहेत.  ते जेव्हा वर्तमान काळामध्ये पुन्हा ज्या वृत्तीने स्मृति रूपाने अंतःकरणात जागृत होतात, त्या वृत्तीला ‘चित्त’ असे म्हणतात.  या वृत्तीमुळे आपल्याला भूतकाळाचे सर्व स्मृतिरुपाने आठवते.

अहंकार – मन, बुद्धि आणि चित्तामधील सर्व वृत्ति सतत बदलत असतात.  परंतु या सर्व वृत्तींच्या मागे न बदलणारी एक वृत्ति आहे.  ती म्हणजे ‘अहम्’ वृत्ति होय.  यालाच ‘अहंकार’ असे म्हणतात.  या वृत्तीमुळेच मन, बुद्धि व चित्ताच्या सर्व बदलणाऱ्या वृत्ति समजतात.  या सर्व बदलणाऱ्या वृत्ति ‘अहं’ वृत्तीवर आश्रित असल्यामुळे ‘अहं’ वृत्ति नित्य राहाते.  तीच खरी सर्वांना आधारभूत असलेली वृत्ति आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment