Monday, April 14, 2014

स्वयंप्रकाशमान ज्योत | What is Self-Consciousness ?



श्रीदक्षिणामूर्तिस्तोत्रामध्ये आचार्य एक दृष्टांत देतात - समजा, एखाद्या मातीच्या घटला अनेक छिद्रे पाडली व त्या घटाच्या पोकळीमध्ये एक ज्योत ठेवली, तर त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये घटाच्या आतील सर्व पोकळी व घटाच्या आतील भाग प्रकाशमान होतो.  नंतर तोच प्रकाश किरणांच्या रूपाने जेव्हा छिद्रातून बाहेर सर्व बाजूला पसरला जातो, तेव्हा त्या प्रकाशकिरणांच्या सान्निध्यामध्ये कोणतीही वस्तु आली तर ती प्रत्येक वस्तु प्रकाशमान होते.

वस्तूंना त्यांचा स्वतःचा प्रकाश नसतो.  तर त्या वस्तु परप्रकाशित असल्यामुळे, प्रकाशमान होण्यासाठी दुसऱ्या प्रकाशावर अवलंबून असतात.  ज्योत स्वयंप्रकाशित, स्वयंसिद्ध आहे.  तिचा प्रकाश सर्व वस्तूंना प्रकाशमान करून सुद्धा वस्तूंच्या गुणदोषांनी ती कधीही लिप्त किंवा स्पर्शित होत नाही. किंवा ते गुणदोष तिच्यावर कोणताही परिणाम करू शकत नाहीत.  म्हणजेच ज्योतीचा प्रकाश नित्य, शुद्ध, अलिप्त, असंग व अविकारी राहून तोच सर्वांना नित्य साक्षीस्वरूप राहातो.

त्याप्रमाणे शरीररूपी घटामध्ये जन्मतःच इंद्रियरूपी छिद्रे असून त्याच्यामध्ये ज्योतीप्रमाणे स्वयंप्रकाशमान असणारी चैतन्यरूपी ज्योति आहे.  तिच्या प्रकाशामध्ये शरीराच्या आत असणारे सर्व विषय प्रकाशमान होतात.

चैतन्याच्या प्रकाशामध्ये प्रथम ‘अहं’ ची म्हणजेच ‘मी’ ची जाणीव होते व नंतर मनबुद्धिचित्तामधील सर्व प्रकारच्या वृत्ति – घटवृत्ति, पटवृत्ति वगैरे, तसेच कामक्रोधादि विकार व सुखदुःखांचे अनेक अनुभव – या सर्वांची जाणीव होते.  त्यानंतर इंद्रियांची व शरीराची जाणीव होऊन, इंद्रियांमधून सर्व बाह्य विश्वाची व विषयांची जाणीव होते.  थोडक्यात चैतन्यामध्येच मनबुद्धिचित्तअहंकार व त्यांचे सर्व विकार हे अंतर्विश्व आणि बाह्य विषय प्रकाशमान होतात.  त्यांची जाणीव किंवा प्रचीति येते.

 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment