Tuesday, March 11, 2014

भिन्न शरीरावस्था | Stages of the Body

 
बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था या शरीराच्या तीन अवस्था आहेत.  या तीन्हीही अवस्था एकमेकापासून भिन्न असून एक अवस्था संपल्यानंतर दुसरी सुरु होते.  या तीन्हीही अवस्थांना पाहाणारा आणि अनुभवणारा ‘मी’ तीन नसून एकच आहे.  म्हणजेच अवस्था येते आणि जाते, दुसरी सुरु होते.  परंतु ‘मी’ न बदलता एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो.  त्यामुळे आपल्याला बाल्यावस्थेचे किंवा तारूण्यावस्थेचे संस्काररूपाने असलेले अनुभव स्मृतिरुपाने वृद्धावस्थेत सांगता येतात.
 
जर बाल्यावस्थेमधील ‘मी’, तारूण्यावस्थेमधील ‘मी’ आणि सध्याच्या वृद्धावस्थेमधील ‘मी’, तीन भिन्न असतील तर, वृद्धावस्थेमध्ये मागील अवस्थांचे अनुभव सांगता येणार नाहीत.  परंतु असे होत नाही.  याचाच अर्थ तीन्हीही अवस्थांच्यामध्ये ‘मी’ हा एकच आहे व तो न बदलता एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो.  तो ‘मी’ दृश्य शरीराच्या अवस्थेपासून भिन्न आहे.
 
ज्याप्रमाणे मिस्टर रावांनी नाटकामध्ये तीन वेष घेतले  -  एक राजाचा, एक मंत्र्याचा आणि एक भिकाऱ्याचा.  हे तीन्हीही वेष एकमेकांपासून अतिशय भिन्न आहेत.  तसेच त्यांचे अनुभव सुद्धा भिन्न आहेत.  ते वेष धारण करणारे ‘राव’ प्रत्येक वेषामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न होता प्रवेश करतात.  म्हणजे तीन्हीही वेषांमधील मिस्टर ‘राव’ तीन भिन्न व्यक्ति नसून एकच राव आहेत, कारण ते वेषधारी असल्यामुळे वेषांपासून अत्यंत भिन्न आहेत.
थोडक्यात शरीर हे दृश्य, विकारयुक्त आहे आणि ते पाहाणारा ‘मी’ द्रष्टा शरीरापासून भिन्न आहे.  म्हणून शरीर ‘मी’ नाही.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
 
- हरी ॐ

No comments:

Post a Comment