Monday, March 17, 2014

इंद्रिये म्हणजे ‘मी’ नव्हे | Senses and ‘Me’

 
आपल्याला पाच इंद्रिये आहेत.  कर्ण, त्वचा, चक्षु, जिव्हा, आणि घ्राणेन्द्रिय.  बाह्य विषयांचा अनुभव आणि ज्ञान घेण्यासाठी या इंद्रियांची आवश्यकता आहे.  मी बघतो, मी ऐकतो वगैरे अनुभवांमध्ये बघणे, ऐकणे या क्रिया चक्षु किंवा कर्णामुळे आहेत.  त्याशिवाय कोणताच अनुभव घेता येत नाही. इंद्रिये आहेत तर अनुभव आहेत आणि इंद्रिये नाहीत तर अनुभव नाहीत.  इंद्रियांचे अतिशय महत्व असल्यामुळे, जणू काही इंद्रिये म्हणजेच ‘मी’ असे समजून कोणी म्हणेल ‘इंद्रियेच मी आहे’.
 
परंतु इंद्रिये ‘मी’ होऊ शकत नाही.  इंद्रिये बाह्य विषयांचा अनुभव घेण्यासाठी साधने (Instrument) आहेत.  उदा.  चक्षु हे इंद्रिय बाह्य विषयांचे रूप आणि रंग पाहाण्याचे साधन आहे.  साधन किंवा करण (Instrument) हे स्वतः अचेतन असल्यामुळे, कार्यान्वित होण्यासाठी त्यामागे चेतनशक्तीची आवश्यकता आहे, जिच्या अस्तित्वामुळे चेतना मिळून इंद्रिय कार्यान्वित होते, ती चेतनशक्ति इंद्रियांपासून भिन्न असली पाहिजे.
 
तसेच चक्षु हे इंद्रिय शरीराप्रमाणे दृश्य विषय आहे.  त्यामध्ये आंध्यत्व, मांद्यत्व व पटुत्व हे विकार आहेत ते सर्व विकार ‘मी’ पाहातो आणि जाणतो.  म्हणजेच या सर्व विकारांचा द्रष्टा ‘मी’ डोळ्यापासून भिन्न आहे.  तसेच काही व्याधींमुळे दोन्ही डोळे काढले तरी ‘मी’ चे अस्तित्व नाहीसे होत नाही.  डोळे ‘मी’ वर अवलंबून आहेत.  परंतु ‘मी’ डोळ्यांवर अवलंबून नाही.  हाच नियम इतर सर्व इंद्रियांना लागू आहे.
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


 
 
- हरी ॐ
 

No comments:

Post a Comment