Monday, March 18, 2013

सगुण परब्रह्म? (Manifestation of The Supreme Being)

भगवान गीतेमध्ये म्हणतात –

                               उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः |
                               परमात्मेति चाप्युक्तः देहेSस्मिन्पुरुषः परः || (गीता अ. १३/२२)

परब्रह्म हे वस्तुतः निर्गुण, निर्विशेष, निर्विकार स्वरूप आहे. परंतु उपाधीमुळे ते सविशेष भासते. म्हणून उपाधीच्या दृष्टीने पहिले तर जीव-जगत्-ईश्वर हे भेद मिथ्या आहेत, परंतु  अधिष्ठानाच्या दृष्टीने ते तीन्हीही परब्रह्मस्वरूपच आहेत.

इंद्रियांच्या, मनबुद्धीच्या कक्षेत येणारे विषय ग्रहण करणे एवढेच आज स्थूल बुद्धीला माहीत आहे. ‘यत् दृष्टं तत् सत्यम् |  अशीच सर्वांची कल्पना आहे.  माणूस स्वतःला बुद्धिमान समजतो पण भिंतीपलीकडचेही त्याला समजत नाही, दिसत नाही.  अणु पाहायचा असेल तर सूक्ष्मदर्शीची आवश्यकता आहे परंतु, आत्मा हा तर आणूपेक्षाही सूक्ष्म आहे.  त्यामुळे तो डोळ्यांना दिसत नाही, मनाला अनुभवायला येत नाही, बुद्धीला आकलन होत नाही.  म्हणून आत्मा नाही, असे म्हणणे पूर्णतः अयोग्य आहे.  स्वतःच्या बुद्धीची क्षमता नाही, म्हणून परमेश्वरच नाही असे म्हणणे हीच मोठी अंधश्रद्धा आहे.

याउलट – अस्ति इति विश्वासः श्रद्धा | विश्वाच्या मागे कारण असलेच पाहिजे. मग ते दिसो अथवा न दिसो.  ‘ कारणं विना कार्यं न सिद्ध्यति | ’ कारणाशिवाय कधीही कार्याची सिद्धि होऊ शकत नाही.  या जगड्व्याळ विश्वाच्या मागे अधिष्ठान आहेच.

परंतु – ‘यत् दृष्टं तत् सत्यम् | अशी सत्यत्व बुद्धि असणाऱ्या अज्ञानी साधकाला एकदम अध्यासरहित असणारे निर्गुण, निर्विशेषस्वरूप समजणार नाही, कारण हे ज्ञान बुद्धीच्या अतीत आहे. त्यामुळे अशा सामान्य अधिकारी साधकांना हा सर्व अध्यास आहे, असे समजणे अवघड आहे.  त्यासाठीच पुरुषसूक्तात भगवंताच्या सुंदर अशा विराट पुरुषाची कल्पना करतात व सगुण परब्रह्माचे स्वरूप प्रतिपादित करतात.




- "पुरुषसूक्तम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  जानेवरी २००६  
- Reference: "Purushasuktam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 1st Edition, January 2006

- हरी ॐ


No comments:

Post a Comment