Wednesday, March 6, 2013

प्रसादवृत्ति म्हणजे काय? (Attitude of Equanimity)

भगवान गीतेमध्ये म्हणतात –
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ |
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ||  (गीता अ. २-३८)

हे पार्थ! तू एक मुमुक्षु साधक आहेस.  त्यामुळे सुखदुःख, लाभ-हानी, जय-पराजय या सर्व द्वंद्वाना समत्वाच्या दृष्टीने पाहा.  तू तुझ्या कर्तव्यकर्मांच्यापासून च्युत होऊ नकोस.  जीवनामध्ये ‘समे कृत्वा’ ही दृष्टि अत्यंत अवघड आहे. ही दृष्टि आत्मसात कशी करावी? यासाठी व्यवहारातील एक उदाहरण पाहू.

आपण मंदिरामध्ये जातो.  तेथील पुजारी आपल्या हातावर काहीतरी प्रसाद देतो. मग तो प्रसाद पेढा, खडीसाखर, खोबरे, तीर्थ, पत्र, पुष्प काहीही असेल तरी आपण ते अत्यंत आनंदाने, प्रसादबुद्धीने ग्रहण करतो.  त्यावेळी मला प्रसाद काय मिळाला, किती मिळाला याचा आपण विचार करीत नाही. तर उलट जे मिळेल ते आनंदाने ग्रहण करतो.  तेथे आपली आवड-नावड नसते. परमेश्वरकृपेने, भाग्याने आपल्याला प्रसाद मिळाला, याचाच आपल्याला आनंद होतो.  त्यावेळी दुसऱ्याला काय मिळाले?  आपल्यापेक्षा कमी की जास्त मिळाले,  हा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही. यालाच प्रसादवृत्ति म्हणतात.

भगवान म्हणतात –
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते |
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ||  (गीता अ. २-६५)

प्रसाद वृत्तीमध्ये रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा पूर्णपणे अभाव असतो.  त्यामुळे सर्व दुःखे नाहीशी होऊन मन अत्यंत शांत, प्रसन्न, द्वंद्वरहित, तृप्त असते.  यामुळे ही प्रसादवृत्ति साधकाने आत्मसात करावी.



- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  २००१
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 1st Edition, 2001

- हरी ॐ


No comments:

Post a Comment