Saturday, March 9, 2013

गुरुनिष्ठेचे महत्व (Importance of the Faith in The Guru)







गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ति किंवा मर्त्य शरीर नसून गुरु हे तत्व आहे. गुरूंच्याकडे कधीही एक व्यक्ति म्हणून पाहू नये. गुरुशिष्यांच्यामध्ये व्यवहार होऊ नये. गुरूंचे शब्द वेदमंत्रांच्याप्रमाणे प्रमाण मानावेत. आज्ञा गुरूणां ह्यविचारणीया ||

गुरूंनी आज्ञा दिल्यानंतर त्यावर विचार करू नये. स्वतःची बुद्धि चालवू नये. म्हणजेच गुरूंच्या आज्ञेमध्ये तडजोड न करता त्या आज्ञेचे, आदेशाचे पालन करावे. गुरूंना पर्याय देणे म्हणजे गुरूंची अवज्ञा केल्यासारखे आहे. गुरूंनी सांगावे आणि आपण ऐकावे.

अशी जर नितांत श्रद्धा उदयाला आली, तर साधकाच्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न शिल्लक राहत नाही. इतकेच नव्हे, तर त्याला श्रुतींचे गूढार्थही तात्काळ आकलन होतात. अंतःकरणामध्ये ईश्वरी तत्वाची दिव्य अनुभूती येते. तीव्र वैराग्य प्राप्त होऊन तत्वदर्शन होते. त्यालाच क्रमाने सहजावस्था, ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. या सर्व गोष्टी केवळ एका गुरुकृपेने प्राप्त होतात. श्रुति म्हणते –

यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ |
तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः || (श्वेत. उप. ६-२३)

ईश्वरावरील पराभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरुंच्यावर अनन्यसाधारण भक्ति असेल, नितांत श्रद्धा, भक्ति, सेवा, निष्ठेने तो जगत असेल, तर वेदांतातील या मंत्रांचे गूढ रहस्य, मर्म त्याला समजते. परंतु गुरूंच्याविषयी थोडी जरी श्रद्धा कमी झाली, मनामध्ये संशय, विकल्प आले तरी साधकाचे अधःपतन होते. भगवान म्हणतात –

संशयात्मा विनश्यति | (गीता अ. ४-४०)

म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान परमोच्च आहे. गुरुसेवा हीच साधना, गुरुसेवा हीच तपश्चर्या, गुरुसेवा हीच पूजा आहे ! गुरुसेवा हे सर्वश्रेष्ठ साधना आहे.
- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  एप्रिल २०१२  
- Reference: "Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012

- हरी ॐ

No comments:

Post a Comment