वास्तविक
पाहता कोणत्याही मनुष्याला वाटत नाही की, आपण पापकर्म करावे. आपल्या हातून सदाचार घडावा, सत्कर्म घडावे हीच
प्रत्येकाची इच्छा असते. याचे कारण आपला
उत्कर्ष व्हावा, आपण अधिक उन्नत व्हावे हीच प्रत्येकाची सहजस्वाभाविक प्रवृत्ति
असते. त्यासाठी सत्कर्म व सदाचार हेच साधन
आहे हे सुद्धा प्रत्येक मनुष्य जाणत असतो.
मग हे माहित असताना सुद्धा मनुष्य
पापकर्मात प्रवृत्त का होतो ? खरे
पाहता सद्सद्विवेकबुद्धी मनुष्याला पापाचरण करू देत नाही. परंतु या बुद्धीला गप्प बसवून मनुष्य पापकर्म
करतो. ते का?
एखादा
सेवक त्याची इच्छा नसतानाही आपल्या राजाकडून किंवा बलवान मालकाकडून पापकर्मात
प्रवृत्त केला जातो. अशा वेळी सेवकाला
कोणतेही स्वातंत्र्य नसते. त्यामुळे तो
मालकाकडून पूर्वनियोजित होतो. त्याला
प्रवृत्त करणारी बलवान आणि सामर्थ्यसंपन्न शक्ति असते. त्याचप्रमाणे मनुष्य सारासार विचार करणारा
असूनही इच्छा नसताना सुद्धा कोणत्यातरी बलवान शक्तीच्यामुळे अगतिक होऊन पापकर्मात प्रवृत्त
होतो. तर मग बुद्धिवान मनुष्याला अगतिक,
गुलाम बनवून त्याला पापाचरण करायला लावणारी अशी कोणती शक्ति आहे?
भगवान
म्हणतात की, पापाचे कारण विश्वामध्ये बाहेर नसून मनुष्याच्या अंतरंगातच आहे. मनुष्यामध्ये असलेला काम-क्रोध हाच मनुष्याला पापकर्मात
प्रवृत्त करतो. काम आणि क्रोध बाहेर
विषयांच्यामध्ये किंवा प्रसंगांमध्ये नसून मनुष्याच्या अंतरंगातच आहे. बाहेरची शक्ति मनुष्याला पापाचरणामध्ये प्रवृत्त
करीत नाही. यामधून पापाचे कारण बाहेर
आहे हा सामान्य मनुष्याचा लोकप्रसिध्द विचार भगवान खंडन करतात.
- "श्रीमद् भगवद्गीता"
या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- हरी ॐ –
No comments:
Post a Comment