Thursday, February 7, 2013

वाचिक तप म्हणजे काय? (The power of spoken words)

जीवन जगत असताना आपला बराचसा व्यवहार शब्दांच्या साहाय्याने चालतो.  एका शब्दामध्ये हजारो-लाखो जीवांना मारण्याची तसेच वाचविण्याचीसुद्धा शक्ति आहे.  शब्दाने माणसे जोडली जातात. त्याचप्रमाणे तोडलीही जातात.  शब्द हे बाणाप्रमाणे असतात.  एकदा मुखातून शब्द बाहेर पडला की, तो पुन्हा मागे घेता येत नाही.  जरी नंतर आपण sorry म्हटलो तरी त्या शब्दाचा अन्य व्यक्तीवर जो परिणाम व्हावयाचा तो होतोच.  म्हणून हे शब्द अत्यंत जपून वापरावेत.  शब्द उच्चारण्यापूर्वी विचार करून काळजीपूर्वक उच्चारावेत.  हे नियम साधकाने पाळलेच पाहिजेत.  

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्ग्मयं तप उच्यते ||  (गीता अ. ७ – १५)

उद्वेगकारक नसणारे, सत्य, प्रिय व हितकारक वाक्य बोलणे आणि स्वाध्यायाचा अभ्यास करणे हे वाचिक तपस आहे. दुसऱ्याला उद्विग्न, दुःखी, विक्षिप्त करणारे वाक्य कधीही बोलू नये.  

शास्त्रकार सांगतात –
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् |
प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ||

सत्य यथार्थ मात्र जर ते दुसऱ्याला प्रिय असेल तर बोलावे.  मृदू बोलावे.  केवळ बाहेरून गोड-गोड मात्र ते खोटे – असत्य असेल तर बोलू नये.  तसेच, सत्य आहे, प्रिय आहे, असे जर अन्य व्यक्तीला हितकारक असेल तरच बोलावे.  म्हणजे बोलताना तारतम्य ठेवावे.  वाणीवर संयमन ठेवावे.  What I talk that I mean. What I mean, that only I talk.  हेच वाचिक तप आहे.  अनुद्वेगकरत्व, सत्यत्व, प्रियत्व आणि हितत्व या चारही विशेषणांनी युक्त असलेल्या वाक्याचा उच्चार करणे म्हणजेच वाचिक तप होय.

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

                                                             - हरी ॐ

No comments:

Post a Comment