प्रत्येकाला
निरनिराळ्या प्रकारच्या निष्ठा असून कामना सुद्धा भिन्न स्वरूपाच्या असतात. त्या
त्या इच्छेने परमेश्वराला ते भजतात. परमेश्वर त्यांच्या इच्छेनुरूप व कर्मानुरूप
त्यांच्यावर कृपा करतो. असे
चार प्रकारचे लोक आहेत –
१) ऐहिक आणि पारलौकिक फळाच्या इच्छेने कर्म करणारे हे सकाम
भक्त आहेत.
२) वेद प्रतिपादित शास्त्रोक्त कर्म करणारे साधक निष्काम
मुमुक्षु असून त्यांना ऐहिक किंवा पारलौकिक कोणत्याही फळाची अपेक्षा नसते. तरी
सुद्धा परमेश्वराला प्रसन्न करून, अंतःकरणशुद्धि व ज्ञानवैराग्यप्राप्तीसाठी
निस्वार्थ, निष्काम वृत्तीने सेवा करतात. अशा साधकांना परमेश्वर
त्यांच्या इच्छेप्रमाणे चित्तशुद्धि, ज्ञानवैराग्यसंपन्न करून सद्गुरूंची प्राप्ति
करून देतो आणि गुरुमुखामधून ज्ञानाचा उपदेश करून त्यांची ज्ञानाची इच्छा पूर्ण
करतो.
३) श्रवण-मनन करून आत्मानात्मविवेकाने ज्यांनी ज्ञान
प्राप्त करून घेतले आहे आणि ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी सर्वसंगपरित्याग करून संन्यास
धारण केलेला आहे, त्यांना मोक्षप्रदान करून मोक्षेच्छा पूर्ण करतो.
४) याव्यतिरिक्त जे अत्यंत आर्त असून सर्व बाजूंनी
दुःखाने त्रस्त झालेले, व्याकूळ, अगतिक झालेले परमेश्वराला शरण जाऊन दुःखनिवारण करण्यासाठी
प्रार्थना करतात, त्यांच्या दुःखांचा निरास करून त्यांना दुःखमुक्त करतो.
प्रथम
भक्त विषयासक्त, सकाम, धार्मिक भक्त असतात. नंतर
हळूहळू धार्मिक भक्त निष्काम होऊन चित्तशुद्धि करतात व वैराग्यसंपन्न होतात. यामधूनच
त्यांच्या मनामध्ये आत्मजिज्ञासा निर्माण होऊन त्यांना सद्गुरूंची प्राप्ति होते. ते
गुरुमुखामधून शास्त्रश्रवण, मनन आणि अखंड निदिध्यासना करून ब्रह्मज्ञान प्राप्त
करतात आणि ब्रह्मस्वरूप होऊन परमात्मस्वरूपाला प्राप्त होतात.
(श्रीमद् भगवद्गीता ४-११)
- "श्रीमद् भगवद्गीता"
या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- हरी ॐ –
No comments:
Post a Comment