Tuesday, February 24, 2026

विनाशाचा क्रम | Sequence Of Self-Destruction

 




आपले मन साधुसंगतीमध्ये, ईश्वरामध्ये रमत नसेल, चिंतन करीत नसेल तर ते साहजिकच जड विषयांच्यामध्ये, अनात्म्यामध्ये रमेल.  विषयांचेच चिंतन करील. (ध्यायतो विषयान्स्पुंसः)  त्या चिंतनामुळे हळूहळू विषयांचे आकर्षण निर्माण होऊन विषयांचे प्रेम निर्माण होते.  आसक्ति निर्माण होते. मग विषय समोर असो किंवा नसो विषयांचेच विचार मनामध्ये रात्रंदिवस घोळत राहातात. त्यातच मनाला सुख वाटते.  बरे वाटते.  (संगस्तेपूषजायते)  यामधून प्रिय विषय हवाहवासा वाटतो आणि आपोआपच तो आपल्याजवळ असावा असे वाटते.  तो प्राप्त करण्याची कामेच्छा निर्माण होते.  याचाच परिणाम म्हणजे विषयध्यास लागतो.  तो मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करावयास लागतो.

 

(संगात्संजायते कामः)  परंतु अनेक वेळेला प्रयत्न करूनही कामेच्छा पूर्ण होईलच असे नाही.  उलट प्रयत्नामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात.  प्रतिबंध येतात.  यामुळे तोच काम, क्रोधाची भावना निर्माण करतो.  (कामात्क्रोधोSभिजायते)  क्रोधाची भावना अनावर झाली की, विवेक नाहीसा होतो.  बुद्धीला संमोह-संभ्रम निर्माण होतो.  त्यामुळे योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार विवेक संपतो.  मनावरचे संयमन, मनाचे संयमन सुटते.  मन आणि बुद्धि भ्रमिष्ट होते.  (क्रोधात्भवति संमोहः)  क्रोधाविष्ट झालेल्या मनामध्ये मूढत्वामुळे स्मृतीचा ऱ्हास होतो.  म्हणजेच कोणत्याही प्रसंगामध्ये योग्य-अयोग्य, चांगले-वाईट परिणाम मनुष्य विसरतो.  (संमोहास्मृतिविभ्रमः)

 

खरे पाहाता आपल्याकडून अपेक्षित कर्म कोणते, कसे वागावे, बोलावे, कसे योग्य आचरण ठेवावे यासाठी आपल्यावर आई-वडील आणि आचार्य सतत संस्कार करीत असतात.  अनेक शास्त्रांचे अध्ययन, धर्मशास्त्र, वेदान्तशास्त्राचे अध्ययन आणि त्यामधून मिळालेल्या ज्ञानाचे प्रयोजन सुसंस्कृत, सद्विचारी, सदाचारी मनुष्य व्हावा हेच आहे.  हेच संस्कारयुक्त ज्ञान स्मृतिरूपाने प्रत्येक प्रसंगामध्ये योग्य ते कर्म करावयास प्रवृत्त करीत असते.  परंतु ही स्मृतिच जर अनावर क्रोधाने गिळंकृत केली तर ज्ञानसंपन्न असूनही मनुष्याचा तोल जाईल आणि जे करू नये ते तो करेल, जे बोलू नये ते तो बोलेल, जे खाऊ नये ते तो खाईल.  तो पशुतुल्य होईल.  हाच मनुष्याचा नाश आहे.  (स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति)  कारण तो मनुष्यत्व टाकून अत्यंत हिंस्र पशूप्रमाणे झालेला आहे.

 


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ



Tuesday, February 17, 2026

मन चेतन आहे की जड ? | Is Mind Conscious Or Gross ?

 




ज्याचा आपल्या शाश्वत आणि अद्वय रूपामध्ये निश्चय नसतो, म्हणून अविद्येमुळे ज्याच्यामधून हे द्वैतात्मक जग उत्पन्न होते त्यालाच 'चित्त' असे म्हणतात.  जे जड नाही व अजडही नाही, तसेच जे अस्थिर असून कल्पनारूप असते, अविद्येमुळे जे म्लान होते, त्या चैतन्याच्या वृत्तीला 'मन' असे म्हणतात.  स्पंदरहित, मलीन व अनेक कलंकांनी युक्त असणारे जे चित्, ते म्हणजेच मन असून ते ना अचेतन आहे, ना चेतन आहे.  हे राघवा !  अहंकार, मन, बुद्धि, जीव, ही व अशीच अनेक चित्र-विचित्र नावे या चैतन्यासाठीच कल्पित केली आहेत.

 

जसे आरशामध्ये सर्व रूपे दिसत असल्यामुळे त्या सर्व रूपांचे कारण आरसा आहे.  तसेच मनामध्ये सर्व विषयांचा अनुभव येत असल्यामुळे सर्व दृश्य विषयांचे कारण मन आहे.  त्यामुळेच जो आपल्या मनाच्या अधीन आहे, तोच मनुष्य बद्ध होतो व जो आपल्या मनापासून मुक्त आहे तोच खऱ्या अर्थाने मुक्त पुरुष आहे.

 

अज्ञानी मनुष्य उपाधीच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे त्याला ते मन जड वाटते.  परंतु ज्ञानी पुरुष तत्त्वाच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे त्याला तेच मन चैतन्यमय वाटते.  त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तसे तसे मन आहे.  परंतु वस्तुतः मन हे ना चेतन आहे ना जड आहे.

 

अज्ञानी जीवाला विषयवासनांच्यामुळे जेव्हा चित्तामध्ये अनेक सुखदुःखांचा अनुभव येतो, तेव्हाच जणु काही या संसाराचा उदय होतो.  मात्र जेव्हा हे मन तत्त्वाशी एकरूप होते, म्हणजे स्वस्वरूपामध्ये लय पावते, त्यावेळी मात्र हा सर्व अनुभवायला येणारा घोर संसारही लय पावतो.  अविद्येने मलीन व कलुषित झालेल्या मनाच्या भ्रांतीने हे जग उत्पन्न झालेले आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022




- हरी ॐ



Tuesday, February 10, 2026

आचार्योपासना - २ | Worship of The Teacher - 2

 



आचार्योपासनेचा दुसरा अर्थ सांगतात.  उपासना = उप + आसन.  उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे.  आचार्योपासना म्हणजेच आचार्यांच्या जवळ, समीप बसणे.  येथे शरीराने जवळ जाणे असा शाब्दिक अर्थ नाही.  आचार्यांचे आसन म्हणजेच आचार्य जेथे बसतात, निवास करतात ते स्थान स्वस्वरूप होय.  भगवान म्हणतात -

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ||                      (गीता अ. ५-१३)

 

ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणजेच गुरु हे सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून काहीही न करता आणि करविता स्वस्वरूपामध्ये स्वस्थ, स्थिर होतात.  किंवा –

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टः |                              (गीता अ. १५-१५)

सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये प्रत्यगात्मस्वरूपाने, परब्रह्म स्वरूप असणारे आचार्य, गुरु निवास करतात.

 

श्रुति म्हणते -

ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति |                                   (मुंडक. उप. ३-२-९)

ब्रह्मस्वरूप जाणणारे आचार्य स्वतःच ब्रह्मस्वरूप होतात.  अशा ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आचार्यांच्या जवळ बसणे म्हणजे आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप होणे होय.  आचार्यांचे आसन शास्वत, स्थिर, चिरंतन आहे.  म्हणून आचार्योपासना करण्यासाठी साधकाने गुरूंच्या मुखामधून आत्मज्ञानाची प्राप्ति करून ज्ञाननिष्ठा प्राप्त करावी आणि स्वस्वरूपामध्ये, निरतिशय आत्मस्वरूपामध्ये स्वस्थ, स्थिर व्हावे.  हीच परिपूर्णतेची, कृतकृत्यतेची परमोच्च अवस्था आहे.  यालाच आचार्योपासना असे म्हणतात.

 

स्वस्वरूपाच्या ज्ञानाने सर्व अज्ञानकल्पित भेद गळून पडतात.  अहंकार, ममकारादि प्रत्यय निरास होतात.  इतकेच नव्हे तर गुरु आणि शिष्य हाही भेद गळून पडतो.  दोघेही एकरूप होतात.  अत्यंत दुःखनिवृत्ति होऊन निरतिशय आनंदाची प्राप्ति होते.  साधक स्वतःच आनंदस्वरूप होतो.  स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होतो.  हीच खरी आचार्योपासना आहे.  साधकाने हा गुण आत्मसात करावा.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, February 3, 2026

घनाभ्यास | Deep Study

 



वसिष्ठ मुनींनी मोक्षप्राप्तीमध्ये विचारमार्गाचा आग्रह धरला आहे.  मोक्षप्राप्तीमध्ये अन्य सर्व साधना किंवा मार्ग हे चित्ताच्या शुद्धीसाठी सांगितले आहेत.  परंतु विचारमार्गाने मात्र प्रत्यक्ष निर्वाण पदापर्यंत पोहचता येते.  विचारांच्यामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य आहे. म्हणून या संपूर्ण ग्रंथामध्ये ३२००० श्लोकांच्यामधून वसिष्ठ मुनि मनुष्याला अनेक प्रकारे व अनेक पद्धतीने विचारप्रवृत्त करतात आणि सांगतात की, मोक्षप्राप्तीमध्ये या ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही.

 

जो या शास्त्राचा घनाभ्यास करेल त्याला अपूर्व पांडित्य प्राप्त होईल.  म्हणून एखादे पुस्तक किंवा मासिक वाचल्याप्रमाणे हे शास्त्र, उपनिषदे किंवा योगवासिष्ठ ग्रंथ हे केवळ पुन्हा पुन्हा वाचणे म्हणजे अभ्यास नव्हे.  काही वेळेला साधक शालेय पाठयपुस्तकाप्रमाणे उपनिषदे वाचतात.  त्यावरून टिपणे काढतात आणि आत्मानुभूतीची अपेक्षा करतात.  वसिष्ठ मुनि या सगळ्या पद्धतींचे येथे खंडन करतात आणि सांगतात की, साधकाने एकांतवासामध्ये जाऊन या शास्त्राचा घनाभ्यास करावा.  म्हणजे जे मी ऐकले त्याचे मनाने पुन्हा पुन्हा चिंतन करावे.  शास्त्रचिंतनासाठी एकांतवास आवश्यक आहे.  कारण एकांतवासामध्येच चिंतनासाठी आपले मन उपलब्ध होते.

 

याप्रमाणे जो साधक अखंडपणे अंतर्मुख होऊन शास्त्रचिंतन करेल त्याला अपूर्व असे पांडित्य प्राप्त होईल.  येथे पांडित्य म्हणजे शाब्दिक विद्वत्ता किंवा वक्तृत्व नव्हे.  आदि शंकराचार्य 'पंडित' या शब्दाची व्याख्या करतात - पण्डा आत्मविषया बुद्धिः येषां ते |  ज्याच्यामध्ये आत्मबुद्धि, आत्मज्ञान उदयाला येते, त्यांना 'पंडित' असे म्हणतात.  या ग्रंथाच्या श्रवणाने असे अपूर्व पांडित्य उदयाला येऊन साधकाच्या मनावर ज्ञानाचे उत्तम संस्कार होतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ