Tuesday, November 25, 2025

कर्म म्हणजेच मन आहे | Action Itself Is Mind

 



या अनंत, सर्वशक्तिमान, महान असणाऱ्या आत्मतत्त्वापासून उत्पन्न झालेल्या संकल्पशक्तीच्या रूपाला 'मन' असे म्हणतात.  म्हणून संकल्प म्हणजेच मन आहे. "हे सत् आहे की असत् आहे ?"  याप्रमाणे मनुष्यामध्ये जो अस्थिर भाव उत्पन्न होतो,  जेथे निश्चय झालेला नसतो, त्या द्वंद्वात्मक भावाला मन असे म्हणावे.  या अवस्थेमध्ये दोलायमान स्थिति असते. "हे की ते?" अशी संभ्रमावस्था असते.

 

ज्या स्थितीमध्ये जीव प्रकाशस्वरूप आत्मचैतन्याला जाणत नाही, त्यामुळे तो अज्ञानी जीव स्वतःला कर्म करणारा कर्ता म्हणवून घेतो, जीवाच्या या भ्रामक अवस्थेलाच मन असे म्हणतात.  हे राघवा !  कल्पनेशिवाय व क्रियाशक्तिशिवाय मनाचे अस्तित्व शक्य नाही.  ज्याप्रमाणे या जगात गुणहीन मनुष्य गुणी असू शकत नाही, त्याचप्रमाणे मन कल्पनेशिवाय आणि क्रियाशक्तिशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही.  म्हणून जेथे जेथे कल्पना व कर्म दिसते तेथे मन आहेच.  कारण सर्व कल्पना व कर्मे यांचे उगमस्थान मन आहे.

 

हे रामा !  ज्याप्रमाणे अग्नि आणि उष्णता या दोन्हींची सत्ता भिन्न नसते, त्याचप्रमाणे कर्म व मन एकरूप असतात.  तसेच जीव व मनही एकरूप असतात. म्हणून 'कर्म-मन' व 'जीव-मन' हेही भिन्न नाहीत.  त्यामुळे सिद्ध होते की, कर्म आणि जीव हेही एकरूपच आहेत.  आपल्या संकल्परूप शरीराने म्हणजे चित्तरूपी कर्माने व कर्मफळांच्या रूपाने या जगाचा भयंकर मोठा विस्तार केला आहे.  सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर, चित्त संकल्प करते, त्यामुळे जीव कर्म करतो.  मग त्या जीवाला कर्माचे फळ प्राप्त होते.  अनेकविध योनि प्राप्त होतात.  याप्रमाणे संसाराचा विस्तार होतो.

 

वासना व कल्पनांचा विस्तार म्हणजेच हे जग आहे.  या विश्वामध्ये ज्या ज्या जीवाने ज्या पदार्थामध्ये जशी वासना निर्माण केली असेल ती वासनाच त्याला तसतसे फळ प्राप्त करवून देते. म्हणजे वासनेनेच कर्म घडते व कर्मानुरूप जीवाला फळ प्राप्त होते.  म्हणून हे राघवा !  मनस्पंदनरूपी कर्म हेच या संसार वृक्षाचे बीज आहे.  सर्व क्रिया म्हणजे विविध शाखा असून कर्मफळे म्हणजे या संसारवृक्षाची विचित्र फळे आहेत.  थोडक्यात मनापासूनच हा सर्व संसारवृक्ष उत्पन्न होतो.  मन जसजसे कल्पना करते तसतशी इंद्रिये त्या त्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतात.  म्हणून "कर्म म्हणजे मन आहे" असे म्हटले आहे.  


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, November 18, 2025

सुखप्राप्ति - मनुष्याचे कर्तव्य | Bliss – The Duty of Human Life

 




आपण आपल्या जीवनाचे निरीक्षण केले तर समजते की, जन्मल्यापासून मृत्युपर्यंत आपण अनेक विषय पाहातो, त्यांचा यथेच्छ उपभोग घेतो.  त्या उपभोगामधून सुख मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो.  या विषयामधून मला सुख मिळेल, अशी खुळी कल्पना करून तो विषय उपभोगतो.  एका विषयामागून दुसरा, तिसरा असे असंख्य अगणित, कोट्यवधी विषय उपभोगतो. विषयसंग्रह करतो.  धन, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सत्ता, कीर्ति, मान-सन्मान सर्वकाही प्राप्त करतो.  परंतु, खरोखरच या सर्वांच्यामधून आपण सुखी झालो आहोत का ?

 

विषयोपभोग घेत असताना निश्चितपणे सुखाचा भास होतो.  सुख मिळाल्यासारखे वाटते.  पण छे !  दुसऱ्याच क्षणी आपल्या हातून ते सुख निसटून जाऊन आपण पूर्ववत्, कदाचित् पूर्वीपेक्षा अधिकच दुःखी (miserable) होतो.  हीच जीवनाची शोकांतिका आहे.

 

विषयांच्या या बाजारामध्ये आपण जीवन जगतो, व्यवहार करतो, हसतो, खेळतो.  परंतु निरागस, निर्भेळ, शाश्वत आनंद मात्र प्राप्त होत नाही.  विषयांच्यामधून खरोखरच जर आनंद मिळत असेल तर जो या विश्वामध्ये सर्वाधिक श्रीमंत मनुष्य आहे, तो सर्वात 'सुखी' झाला असता.  परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.  सुख हे विषयांच्यामध्ये नाही.  त्याप्रमाणेच अन्य घटपटादि विषयांच्याप्रमाणे 'सुख' ही बाजारपेठेत पैसे देऊन विकत मिळणारी एखादी वस्तुही नाही.  या विश्वात सर्वकाही पैशाने मिळते.  परंतु लाखो, कोटयवधी रुपये मोजूनही कोठेही 'सुख' मात्र मिळत नाही.

 

मग प्रश्न निर्माण होईल की, अंतरिक, शाश्वत सुख कोठे आहे ?  समर्थ रामदास म्हणतात -  

जगी सर्वसूखी असा कोण आहे ।  विचारी मना तूचि शोधूनि पाहे ।।           (मनोबोध )

आपल्याला हवे असणारे अंतरिक सुख हे बाहेर विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये नसून आपल्या आतच अंतरंगामध्ये आहे.  आज ज्याठिकाणी मला नैराश्य, वैफल्य, दुःख, द्वन्द्व, संघर्ष अनुभवाला येतात त्याच अंतःकरणामध्ये आपण सुखाचा शोध घेतला पाहिजे.  तो आनंद, शाश्वत, चिरंतन सुख प्राप्त करणे, हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, November 11, 2025

अनंतकोटीब्रह्माण्डनायक | Master Of Infinite Universes

 




हे रामा !  ज्याप्रमाणे प्रचंड मोठ्या मेरू पर्वतावरील एखाद्या फुलामध्ये एखादी भ्रमरी राहते, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या एका रोमाच्या एका टोकामध्ये ही जगद्रूपी लक्ष्मी निवास करते.  असे कोट्यवधि रोम असल्यामुळे अशा कोट्यवधि सृष्टि, ब्रह्माण्ड ज्ञानी पुरुषामध्ये स्थित असतात.  त्याच्या दृष्टीने एक जग नसून अशी कोटी ब्रह्मांडे त्याच्या हृदयाकाशामध्ये स्थित असतात.  हे रामा !  एकेका परमाणूमध्ये हजारो सृष्टि निर्माण होऊन अस्तित्वात असतात.  ज्ञानी पुरुष अशा अनंत सृष्टींना स्वतःच उत्पन्न करतो, स्वतःमध्ये धारण करतो व स्वतःमध्येच या सृष्टींचा लय करतो.  म्हणजे तोच या अनंत कोटी सृष्टींचा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता होऊन अनंतकोटीब्रह्माण्डनायक होतो.  त्या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या दृष्टीने ज्ञानी पुरुषासाठी हे दृश्य जग अतिशय छोटे, निकृष्ट, नगण्य व असत्  स्वरूपाचे असते.  तो स्वतःच स्वतःमध्ये या अनंतकोटी ब्रह्मांडांना पाहतो.  त्या सर्वांचा साक्षी होतो.  ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हे जग अंशमात्र सुद्धा नाही.

 

मी तुला इतकेच सांगू शकतो की, रामा !  ज्ञानी पुरुष अनंतकोटी ब्रह्मांडांचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता तर आहेच !  परंतु रामा !  असे लक्षावधि व अब्जावधि हरिहर एका ज्ञानी पुरुषामध्ये सामावलेले असतात.  एक वेळ एका हरीचे वा एका हराचे दर्शन सोपे आहे.  परंतु ज्याच्यामध्ये लाखो शिव आणि विष्णु सामावलेले असतात, जो कोट्यवधि सृष्टींना धारण करतो आणि कोट्यवधि सृष्टींचा निरास करतो, तो एकमेवा द्वितीय असणारा ज्ञानी पुरुष आहे.

 

हे रामा !  तू माझ्या या विधानाला अतिशयोक्ति समजू नकोस.  जीवनमुक्त ज्ञानी पुरुष कोट्यवधि जीवांच्या अंतःकरणामधील कोट्यवधि संसारांचा या निर्वाण ज्ञानाच्या साहाय्याने निरास करतात.  रामा !  तू कल्पना कर एका शिवाचे दर्शन सुद्धा किती सत्य, शिव व सुंदर असते.  असे लाखो शिव एकत्र आले, विश्वाला धारण करणारे जगदाधार लाखो विष्णु एकत्र आले, ज्ञानाच्या तेजाने तळपणारे लाखो सूर्य एकत्र आले तर त्यांच्या दर्शनाप्रमाणेच या जीवनमुक्त पुरुषाचे दर्शन आहे.  या ज्ञानी पुरुषाला लाखो हरिहरांच्याबरोबर त्यांच्या लक्षावधि शक्ति सुद्धा मिळाल्यामुळे ज्ञानी पुरुष अत्यंत सामर्थ्यशाली व श्रेष्ठ होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ








Sunday, November 2, 2025

विश्वनिर्मिती हा अपघात नाही | Creation is Not An Accident

 



विश्व सर्व प्राणिमात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्मांची फळे भोगण्याचे स्थान आहे.  जो जसे कर्म करतो, तसेच त्याला फळ मिळते.  त्यामुळे कोणाला, कोणत्या कर्माचे, कोणते फळ द्यावयाचे, हे सर्वकाही जाणणारा कोणीतरी सर्वज्ञ असलाच पाहिजे, कारण अल्पज्ञ जीवाला कोणत्या कर्माचे कोणते फळ मिळते, हे समजण्याचे सामर्थ्य नाही.  त्यामुळे ईश्वर हाच सर्वज्ञ असल्यामुळे तोच कर्माध्यक्ष व कर्मफळदाता असून त्यानेच ही सृष्टि निर्माण केलेली आहे, हे सिद्ध होते.  ही सृष्टि ईश्वराने अत्यंत विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक व नियोजनबद्ध रीतीने केलेली आहे.  विश्वाच्या नियमात, कर्म-कर्मफळाच्या नियमामध्ये कोठेही गोंधळ दिसत नाही.  एकाने कर्म केले व दुसऱ्यालाच फळ मिळाले, असे कधीही होत नाही.

 

व्यवहारामध्ये आपल्या सर्व यंत्रणा कोलमडून पडतात.  आधुनिक तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असेल तरी आपली यंत्रे बिघडतात.  आपल्या संगणकामध्ये व्हायरस जातात.  काही वेळेस मेमरी कमी पडते, काही वेळेस हार्डवेअर तर काही वेळेस सॉफ्टवेअर खराब होते.  परंतु ईश्वराची यंत्रणा इतकी अद्भुत आहे की, त्यामध्ये अनादि काळापासून असंख्य जीवांची माहिती असते.  कोणी, केव्हा, कोणते कर्म केले, कोठे, कसे, कशासाठी केले ?  त्याला फळ केव्हा, कोठे, कसे, किती मिळणार, या सर्वांच्यावर ईश्वराचे नियमन आहे.  म्हणूनच तो कर्माध्यक्ष व कर्मफलदाता आहे.  भगवान रमणमहर्षि म्हणतात – कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् |                               (उपदेश सारम्)

 

विश्वकर्त्या ईश्वराच्या आज्ञेने जीवाला कर्माची फळे प्राप्त होतात.  ईश्वराशिवाय अन्य कोणत्याही परिच्छिन्न बुद्धीला हे सर्व करणे शक्य नाही.  म्हणून विश्वाची निर्मिती ही विनाकारण झालेली नाही.  विश्व हे अचानक झालेला अपघात, किंवा केवळ अणुरेणूंचा स्फोट नाही.  विश्व हे accidental नाही.  तर विश्वाची निर्मिती ही बुद्धिपुरस्सर, हेतुपूर्वक झालेली आहे.  कारण विश्वामध्ये सुसूत्रता, सुसंगति व नियमितता दैसते.  जेथे जेथे आपणास ही सुसूत्रता अनुभवायला येते, तेथे तेथे त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार हा असतोच.

 

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ