सर्वेषां भूतानां मित्रवदनुकूलतया वर्तत इति
मैत्रः स्वात्मभूतेषु भूतेषु सर्वत्र मित्रवद्वर्तनं विदुषो युक्तम् |
‘मैत्रः’ म्हणजे मैत्रीचा भाव. जो सर्व
भूतमात्रांच्याबरोबर मैत्रीच्या नात्याने, अनुकूलतेने व्यवहार करतो त्याला ‘मित्र’
असे म्हणतात. ब्रह्मज्ञानी पुरुष
सर्वांचा मित्र होतो. त्याच्या मनामध्ये
सर्व भूतमात्रांविषयी जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, स्नेह निर्माण होतो. तो सर्वांनाच पूर्णपणे सामावून घेतो.
एखाद्या मनुष्याचे सद्गुण मान्य करणे फार सोपे आहे; परंतु त्याचे दोष, दुर्गुण, आपल्याला
अनुकूल नसलेले त्याचे व्यक्तिमत्व मान्य करणे फार अवघड आहे. एकदा एखाद्याला मित्र म्हटले की, आपण त्याला
गुणदोषासहित मान्य करतो. तो कसा ही वागू
देत, चिडू देत, रागावू देत, परंतु मी मात्र त्याच्याशी जशास तसे वागत नाही, कारण
त्याला मी माझा मित्र मानलेले असते. माझे
आचरण या मैत्रीला अनुकूल असेच असते. मी
त्याला कधीही दुःख न देता प्रेम, सुख देतो. त्याचप्रमाणे हा ब्रह्मज्ञानी पुरुष तर सर्वच
भूतमात्रांचा मित्र, जगन्मित्र, विश्वमित्र होतो.
लहान, तरुण, प्रौढ, वृद्ध कोणीही असो, तो या
सर्वांशी अत्यंत आपुलकीने, प्रेमाने वर्तन करतो. लहानात लहान होऊन खेळतो, तरुणांच्यामध्ये
त्यांच्या गप्पागोष्टींमध्ये रस घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करतो, प्रौढांच्यामध्ये
प्रौढ होतो तर वृद्धांच्या सुखदुःखांशी समरस होऊन त्यांना दिलासा देतो. या प्रेमाला वय, धर्म, जाति, स्त्री-पुरुष,
गरीब-श्रीमंत असे कोणतेही बंधन अथवा मर्यादा नसतात. तसेच हे प्रेम निष्काम, निरपेक्ष, निःस्वार्थ
असते. यामुळेच त्याचे प्रेम रागद्वेषरहित, शुद्ध, अमर्यादित असते. म्हणून असा हा पुरुष सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्याचे मन अत्यंत शुद्ध, सात्त्विक,
गंगाजळाप्रमाणे निर्मळ, निरागस झाल्यामुळे तो सर्वांच्यावर
निर्व्याज प्रेम करू शकतो.
व्यवहारामधील प्रेम हे स्वार्थापोटी केलेले,
सकाम, रागद्वेषयुक्त, कलुषित असते. त्यामुळे ते वर-वर चांगले वाटले तरी शेवटी
दुःखालाच कारण होते. थोड्याशा
सहवासाने त्या व्यक्तिविषयी मनामध्ये तिटकारा, द्वेष निर्माण होतो. याउलट जो
शुद्धात्मा, ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या सान्निध्यात, सहवासात जो जो कोणी येईल
त्या सर्वांनाच शुद्ध प्रेमाचा अनुभव येतो, कारण ब्रह्मज्ञानी पुरुष हा स्वतःच
प्रेमस्वरूप, आनंदस्वरूप आहे. त्यामुळे
दुसऱ्याकडून कशाचीही यत्किंचितही अपेक्षा, इच्छा नसते. हा आनंद क्षणाक्षणाला वर्धन पावतो, उत्कार्षित
होतो. हा आनंद सर्वांना देत असल्यामुळेच
ब्रह्मज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांचा, विश्वाचा मित्र होतो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–