Tuesday, January 21, 2025

शास्त्र कसे रुजवावे ? | How To Assimilate Science ?

 



शास्त्र कसे ऐकावे ?  कसे सांगावे ?  शिष्याच्या अंतःकरणामध्ये हे ज्ञान कसे रुजवावे ?  याच्या सुद्धा विशिष्ठ पद्धती आहेत.  प्रसन्न मनाने ऐकले तर त्या शब्दांचे गूढार्थ अंतःकरणामध्ये लागेचच उमटतात.  परंतु शास्त्र ऐकताना मन उद्विग्न होत असेल तर समजावे की, आपल्या अंतःकरणात अजूनही अनेक दुर्गुण आहेत.  वैषयिक, भोगासक्त, बहिर्मुख लोक शास्त्रश्रवण करू शकत नाहीत.  मनामध्ये अनेक प्रकारांच्या भयंकर कामना आणि वासना असतील तर श्रवणाने मन शांत न होता अधिक उद्विग्न होते.  त्यालाच येथे 'पशुबुद्धि' असे म्हटले आहे.

 

म्हणून मोक्षाच्या प्रामाणिक इच्छेने जर शास्त्राचे श्रवण करायचे असेल, तर मन काही प्रमाणात तरी शुद्ध, सात्त्विक व अंतर्मुख असणे आवश्यक आहे.  अन्यथा अनधिकारी मनुष्य जर बळजबरीने शास्त्र ऐकायला बसला, तर तो अर्ध्यातून उठून जाईल.  त्याला कोणतीही प्राप्ति होणार नाही.  एका बाजूला मोक्षाची इच्छा करून शास्त्र ऐकायचे आणि दुसऱ्या बाजूने मनामध्ये विषयांच्या इच्छा निर्माण करायच्या !  असे केले तर अशा मनुष्याला ना भोग मिळत, ना स्वर्ग मिळत, ना मुक्ति मिळत !

 

याप्रमाणे अधिकारित्व नसताना, मनाची तयारी नसताना, जे लोक केवळ बहिरंगाने अध्यात्ममार्गाचे आचरण करतात, ते अध्यात्मापासून सुद्धा च्युत होतात.  पुन्हा एकदा भोगमय जीवन जगत राहतात. ते सर्व पशुतुल्य लोक आहेत. ना धड प्रपंच, ना धड परमार्थ !  ही भयंकर अवस्था आहे.  म्हणून साधकाने या मार्गामध्ये आल्यानंतर मनापासून साधना करावी.

 

रामा !  श्रेष्ठ साधु पुरुषांच्या सहवासामध्ये गेलास की, त्या सत्संगाच्या प्रभावानेच तुझे अंतःकरण शीतल होईल, तुझ्या मनामधील विषयकामनांचे जंजाळ कमी होऊन कामक्रोधादि विकार व त्यांचा प्रभाव कमी होईल.  सत्पुरुषही हे ज्ञान सहजासहजी देत नाहीत.  म्हणून ज्ञानार्जनासाठी नितांत श्रद्धा, विनयशीलता आणि भक्तीचा भाव आवश्यक आहे.  अशा मनामध्येच सत्पुरुषांचा उपदेश फलद्रूप होतो.  सत्पुरुषांच्या मुखामधून याप्रमाणे मनापासून शास्त्राचे श्रवण केले तर हे गुह्य ज्ञान, ज्ञाननिष्ठा, परमपदाची अनुभूति शीघ्रतेने प्राप्त होते.  "अरे रामा !  महिना सुद्धा नाही, काही दिवसांच्यामध्येच हे परमपद प्राप्त होते.  रामा !  अरे आत्मप्राप्तीला एक महिनाही लागत नाही.  इतके हे ज्ञान सुविज्ञेय, सुलभ आणि सहज आहे."

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ