ज्ञानमाहात्म्यव्यतिरिक्त केलेले
प्रेम इंद्रियांची तृप्ति करण्यासाठी असते. या प्रेमामध्ये फक्त स्वतःपुरताच किंवा स्वतःला सुख
कसे होईल हाच विचार असतो. दुसऱ्याच्या मनाचा
- भावनेचा विचार केला जात नाही. त्यामुळे दोघांनाही
सुख मिळण्याची शक्यता कमीच असते. उपभोगाच्या वृत्तीमुळे कामवासना पूर्ण होईपर्यंत
त्यात संतुष्टता नसते. ज्यावर आपण प्रेम करतो
त्याचा नाश होतो.
उदाहरणार्थ फूल ! सुंदर, सुवासिक, अतिशय मनमोहक फूल बघितले की लगेच
ते तोडण्याची वासना निर्माण होते. ते उपभोगावेसे
- म्हणजे डोक्यात घालावेसे वाटते. वास घ्यावा
असे वाटते आणि स्वतःच्या सुखासाठी आपण ते तोडतो. प्रेमासाठी प्रेम नाही तर उपभोगासाठी प्रेम करतो.
कामवासनेचा भस्मासुर जागृत झाला की कामुक वृत्ति
जागी होते. मग ती फुलावरील असो, व्यक्तिवरील
असो अगर प्रियतमावरील असो. विषय भिन्न पण अविष्कार
तोच ! मी उपभोगणार व सुखी होणार. हे प्रेम, प्रेम नसून शुद्ध कामुकता आहे.
मग प्रेम कसे असावे ? गोपींच्यासारखे प्रेम असावे. त्या प्रेमाला मर्यादा नाही, तुलना नाही, भंगुरत्व
नाही. असे ते शिवम्-सुन्दरम् प्रेम होते. त्या प्रेमात उपभोगाची स्वार्थी वृत्ति नव्हती. तर प्रियतम श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याची वृत्ति
होती. सेवावृत्ति होती. भगवंतासाठी जगावयाचे व त्याच्यासाठीच सर्व कर्म करावयाचे
हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या प्रेमात
शुद्धता होती, कामुकता नव्हती. व्याकुळता, अगतिकता, शरणागति, त्याग होता. श्रीकृष्णाला अनुकूल अशाच त्यांच्या वृत्ति होत्या.
गोपींचे प्रेम कामुक नसून निस्वार्थ,
निष्काम, शुद्ध प्रेम होते. हे प्रेम समर्पण
भावामुळे निर्माण झालेले होते. ते परमप्रेमस्वरूप
होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण
राधेची आणि गोपींची प्रशंसा करतात. गोपींच्या
सारखे प्रेम या त्रिखंडात नाही. माहात्म्यज्ञान
असेल तर प्रेम, भक्ति मिळेल आणि माहात्म्यज्ञान नसेल तर तेच प्रेम कामुक होईल.
मग भक्ति ज्ञानाच्या अधीन होईल. भक्ति कनिष्ठ होईल आणि ज्ञान श्रेष्ठ होईल. परंतु असे नाही. उलट भक्ति माता आहे आणि ज्ञान-वैराग्य तिचे पुत्र
आहेत.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –