सम्यक ज्ञान कर्माला निर्बीज कसे करते ? प्रत्येक कर्माचे कारण आहे विषयकामना किंवा
तृष्णा ! त्याचे कारण विषयासक्ति ही आहे. आणि विषयासक्तीचे कारण विषयभोगवासना आहे. हेच सर्व कर्मांचे खरे सार आहे. त्यामुळे भोगवासानेमधून संकल्प, संकल्पामधून
कामना, कामानेमधून कर्म, कर्मामधून कर्मफळ आणि पुन्हा कर्मफळाच्या संस्कारामधून
वासना निर्माण होते. हे चक्र अव्याहतपणे
सुरु असते. आपणच आपल्या अहंकाराने
अविचारामधून अनेक प्रकारच्या कल्पनांची वलये निर्माण करून बद्ध होतो.
उदा. रेशमाचा किडा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःमधूनच रेशमाचा
धागा निर्माण करीत असतो. परंतु स्वतःच
निर्माण केलेल्या रेशमाच्या धाग्यामध्ये अडकून गुदमरतो आणि तेच धागे त्याच्या
मृत्यूला कारण होतात. त्याचप्रमाणे मनुष्य
सुद्धा आपण स्वतःच स्वतःबद्दल आणि परमेश्वराबद्दलही कल्पनांचे धागे निर्माण करून
बद्ध होतो, गुदमरून जातो आणि मग कितीही प्रतत्न केला तरी त्यातून सुटत नाही. पुनरपि जननं पुनरपि मरणं | या उक्तीप्रमाणे अखंडपणे जन्ममृत्यूच्या
सापळ्यात अडकतो.
हे कर्माचे बीज ज्ञानरूपी अग्नि दग्ध करतो. विषयासक्तीचा निरास करून विषयभोगवासनेचा पूर्णतः
नाश करतो. इतकेच नव्हे, तर त्यामागील
कर्तृत्व-भोक्तृत्व भावना आणि त्याचेही कारण असलेल्या अज्ञानाचा ध्वंस होतो. उदा. सर्पामध्ये
जोपर्यंत विषारी दात आहेत तोपर्यंतच सापाची भीति वाटते. परंतु एकदा का त्याचे विषारी दात काढले तर
त्याच्यापासून आपल्याला भीति वाटत नाही. सर्प
असूनही नसल्यासारखा आहे. त्याच्याबरोबर
आपण खेळू शकतो, कारण त्याच्यामधील त्याचे विषारी दात काढून टाकलेले असतात. त्याचप्रमाणे विषयभोगवासनेचा नाश केला की,
कर्मामधील सर्व सत्त्व, त्याचे
सामर्थ्य काढून टाकल्यासारखेच आहे. कर्मामधील
सर्व हवाच काढून घेतल्यासारखे आहे. त्यामुळे
कर्म करीत राहिला तरी ते कर्म जीवाला बद्ध करीत नाही.
याचप्रमाणे जीवनाचे खरे सत्त्व जाणून जीवनामधील सुख-दुःखांचे प्रसंग नाटकाप्रमाणेच आहेत
असे समजून जीवन जगत राहावे. म्हणजे कोणताच
प्रश्न येणार नाही. ठेविले अनंते
तैसेचि राहावे | चित्ती असू द्यावे समाधान | याप्रमाणे जीवन जगावे आणि जीवनातील खरा अंतरिक
आनंद, शांति अनुभवावी. मग दुःखाला कधी
थाराच मिळणार नाही.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param Poojya
Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–