प्रथम
मंत्रामधून ‘नमः शिवाय’ या दोन शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे. ‘नमः’ शब्दाचा वाच्यार्थ ‘त्याग’ असून हा अर्थ
कर्मकांडामध्ये प्रसिद्ध आहे. ‘शिवाय’ या
शब्दामध्ये दोन पदे आहेत. शिवाय = शिव +
आय | व्याकरणशास्त्रामध्ये प्रकृति व
प्रत्यय प्रसिद्ध आहेत. ‘शिवाय’ शब्दामधील
‘शिव’ या शब्दाला ‘प्रकृति’ असे म्हणतात तर ‘आय’ हा ‘शिव’ या प्रकृतीचा चतुर्थी
विभक्तीचा प्रत्यय आहे. याप्रकारे ‘शिव’
या प्रकृतीचा वाच्यार्थ ‘आनंद’ हा आहे. ‘आनंद’ या शब्दाने पुढे सांगितले जाणारे
धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार अर्थही उपलक्षित होतात. तसेच ‘शिवाय’ यातील ‘आय’ या चतुर्थीच्या
प्रत्ययाचा वाच्यार्थ ‘फळ’ म्हणजेच ‘मनोवांछित सिद्धी’ असा होतो.
शं शं
आनंदं करोति ददाति इति शङ्करः | जो सर्वांना आनंद प्रदान करतो,
त्यास ‘शङ्कर’ असे म्हणतात. याचे कारण शंकर हा स्वतःच आनंदस्वरूप
आहे. याठिकाणी ‘शिव’ या शब्दामधून एखादी
मर्त्य व्यक्ति किंवा शरीर सूचित केलेले नसून शिव म्हणजेच आनंदस्वरूप ‘परब्रह्म’
होय. या आनंदस्वरूपामध्ये कोणताही
तर-तमभाव, उत्कर्ष-अपकर्ष, उच्च-नीच, उत्कृष्ट-निकृष्ट असा भेद नाही. यानंतर शास्त्रकार ‘शिव’ या शब्दाची आणखी एक
व्याख्या करतात –
शेते
तिष्ठति सर्वं जगत् यस्मिन् सः शिवः शम्भुः विकाररहितः |
ज्याच्यामध्ये
संपूर्ण जग शयन करते, समाविष्ट होते, त्या अविनाशी, अविकारी तत्त्वास ‘शिव’ असे
म्हणतात. तेच तत्त्व
संपूर्ण विश्वामध्ये, चराचरामध्ये तसेच, सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये स्थित आहे. तोच शिव सर्वांना आनंद देणारा आहे. शिव कोणाला आनंद देतो ? याचे उत्तर ‘नमः शिवाय’ यामधून दिलेले आहे. जो साधक ‘नमः’ झालेला आहे, म्हणजेच जो शिवाला
अनन्य भावाने शरण गेलेला आहे, त्यालाच शिव आनंद प्रदान करतो.
- "ॐ नमः
शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च
२०१५
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
-
हरी ॐ –
Good explanation...
ReplyDelete