Tuesday, June 11, 2019

गुरुकृपा अपरिहार्य आहे | Guru’s Blessing is Indispensible




आत्मस्वरूपाचा बोध करणे म्हणजे केवळ प्रवचन देणे नव्हे.  प्रोफेसर भरपूर आहेत.  प्रवचनकार भरपूर आहेत.  परंतु आत्मस्वरूप शिष्याच्या अंतःकरणात प्रकट करणे अत्यंत कठीण आहे.  म्हणून ज्ञान देणे म्हणजे शिकविणे किंवा प्रचार करणे नसून ते श्रोत्यांच्या हृदयामध्ये प्रकट करणे होय.  जसे, एखाद्या गुलाबाच्या कळीला सूर्यकिरणाचा स्पर्श होऊन ते हळूवारपणे उमलते व क्रमाने पूर्ण विकसित होते.  तसेच हे आत्मज्ञान अन्तःकरणात प्रकट झाले पाहिजे.  

शिष्याने उपदेश व उपदेशग्रहण यामध्ये अत्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे.  कारण साधक अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर स्वतःविषयी, दुसऱ्यांविषयी, विश्व, परमेश्वर, आत्मा, गुरु, शास्त्र, साधना या सर्वांच्याविषयी अनंत कल्पना निर्माण करून मनामध्ये कल्पनांचे जंजाळ करतो.  तसेच, अध्यात्मशास्त्रावरील अनेक पुस्तके गोळा करून त्यांचा तौलनिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो.  वेगवेगळ्या महाराजांकडे जाऊन भिन्न-भिन्न साधना करतो.  थोड्या काळात अनुभव आला नाही तर महाराज बदलतो.  अशा शिष्याला आत्मबोध करणे खरोखरच अत्यंत अवघड आहे.  

काही साधक स्वविचाराने, स्वबुद्धीने आत्मानुभव करण्याचा प्रयत्न करतात.  काही साधक टी. व्ही. वर पाहून, काही इंटरनेटवरून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.  काही साधकांना मोबाईल फोनवरून आत्मज्ञान हवे असते.  ही सर्व साधने अत्यंत प्रगत असतील व एकविसाव्या शतकात नव्हे, आणखी कोणत्या युगात जरी मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी उपनिषदांच्यामध्ये श्रुतीने आदेश दिलेला आहे –
तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् |    (मुण्ड. उप. १-२-१२)

आत्मतत्त्वाचे यथार्थ व सम्यक् ज्ञान प्राप्त करण्यासाठी जिज्ञासु साधकाने हातामध्ये समिधा घेऊन, सर्वसंगपरित्याग करून म्हणजेच मन विषयासक्तरहित करून त्याने श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूंनाच शरण जावे.  गुरूंना अनन्य भावाने शरण गेल्याशिवाय गुरूंचा अनुग्रह प्राप्त होणे शक्य नाही आणि गुरूंच्या अनुग्रहाशिवाय ज्ञानाची प्राप्ति होणे शक्य नाही.  केवळ विद्वत्ता, बुद्धि व तर्काच्या जोरावर ज्ञाननिष्ठा मिळत नाही.  या मार्गात गुरुकृपेशिवाय पर्याय नाही.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


No comments:

Post a Comment