Tuesday, August 8, 2017

साधनेमध्ये दयेचा प्रतिबंध | Empathy as an Obstacle


जगात हजारो प्रकारचे दुःख आढळते.  दुसऱ्याचे दुःख आपण सहन करू शकत नाही.  त्याच्या निवारणार्थ दयावृत्ति अवश्य पाहिजे.  पण या दयावृत्तीमुळे “मी दुसऱ्यांचे दुःख दूर करतो, त्यांचे अश्रू पुसतो “ असा अहंकार हळुहळू साधकाच्या मनात निर्माण होतो.  तो अहंकार वाढत जातो.  अंतःकरणात खरोखरीच दयेचा भाव असेल तर त्या दयेने मनुष्य नम्र होतो.  दाखविलेल्या दयेची तो कधीच वाच्यता करत नाही.  

पण नेहमीच असे होत नाही.  दयावृत्तीने अहंकार पोसला गेल्यावर दयाभाव आपोआप नाहीसा होतो व साधकाची सर्व कर्मे अहंकारप्रेरित होतात.  दया दाखविण्याच्या कर्मात मन अपेक्षा बाळगते (Calculative Mind) व दयेची कृति पूर्वनियोजित होते.  सर्वांचे दुःख निवारण करणारा तू कोण ?  कारण दुःखाचे कधीच निवारण होत नाही.  आचार्य म्हणतात, “वातुल किं तव नास्ति नियंता ?विश्वाचा नियामक आणि रक्षक कोणी नाही असे तुला वाटते का ?  सर्वशक्तिमान परमेश्वर असताना त्याच्यापुढे तू कोण ?  तसेच संपूर्ण अफाट विश्वाच्या निर्मितीत तू कुणाच्या खिजगणतीतही नाहीस.  आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत साधकाने रागद्वेषात्मक असणारी कृपा करणे वर्ज्य करावे.

कृपा करणे हा साधूचा स्वभाव आहे.  त्यामुळे कोणीही असो, गरीब, श्रीमंत, शत्रु, मित्र, लहान, मोठा, कोणताही भेद न बाळगता साधु विशाल अंतःकरणाने समभावाने सर्वांवरच दयेचा वर्षाव करत असतात.  प्रत्येक कृति अथवा घटना परमेश्वराच्या इच्छेने घडत असते.  त्यामुळे परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमच्याकडून दुसऱ्याला मदत होते हा योग्य भाव साधकाच्या मनात असावा.  परमेश्वराच्या संकल्पाशिवाय तुम्ही दुसऱ्यावर दया दाखविणे अशक्य आहे.  “मी कृपा करतो“ ही अहंकारी वृत्ति वाढण्यास वेळ लागत नाही.  हा वृद्धिंगत होणारा अहंकार साधकाच्या अधःपाताचे कारण आहे.  अहंकाराने मन स्वस्थ व शांत राहू शकत नाही.  या कारणास्तव “जनकृपा उत्सृज्यताम् हे पथ्य पाळावयास आचार्य सांगतात.  

यासाठी सावधानतेची सूचना म्हणून लोकांवरील कृपा करण्याची वृत्ति, दयार्द्रभाव, तेसच निष्ठुरता या दोन्ही वृत्तींचा साधकाने प्रयत्नपूर्वक त्याग करावा.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ


No comments:

Post a Comment