Tuesday, September 23, 2014

कर्म अपरिहार्य आहेत | Actions are Indispensable

 
अज्ञानी जीव कधीच कर्मरहित राहू शकत नाही. कर्मरहित राहाणे म्हणजेच स्वस्वरूपात राहाणे होय. त्यामुळे ज्ञानी हाच फक्त स्वस्वरूपात नैष्कर्म्यावस्थेमध्ये राहू शकतो. त्याव्यतिरिक्त असणारे अज्ञानी, अविवेकी जीव कर्मरहित राहू शकत नाहीत.
 
याचे कारण, स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणामुळे शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार यांच्याशी तादात्म्य पावून सर्व जीव बहिर्मुख होतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात विषयभोगवासना निर्माण होते. भोगवासनेमुळे ते अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात. तसेच हट्टाने किंवा स्वच्छेने जरी कर्मरहित राहाण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्य कर्मरहित राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणप्राबल्यामुळे सर्व जीव प्रकृतीचे गुलाम होवून कर्मामध्ये प्रवृत्त होतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. म्हणजेच कर्म करावयाचे किंवा करावयाचे नाही, हे जीव ठरवीत नसून प्रकृतीचे गुण ठरवितात.
 
सत्त्व, रज आणि तम हे तीन प्रकृतीचे सहजस्वाभाविक गुणधर्म आहेत. अनेक संकल्प, कामना यांच्यामुळे द्रव्य, गुण, कर्म, जातिवासना तसेच रागद्वेषादि विकार निर्माण होतात. हे सर्व प्रकृतिगुणांच्या अंतःप्रेरणेने जीवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असल्यामुळे सर्व जीव अगतिक होवून त्या त्या संकल्पाच्या आहारी जातात. इतकेच नव्हे तर, कर्म करावे की करू नये हे स्वातंत्र्यही त्यांना राहात नाही. तो प्रबल संकल्प किंवा कामना जीवाला अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त करते. मग ते कर्म अंतरिक असो व बाह्य असो. जीव त्यामध्ये प्रवृत्त होतात.
 
याप्रकारे अज्ञानी जीव प्रकृतीच्या गुणांनी मोहीत झाल्यामुळे प्रकृतीच्या अधीन होतात आणि ती प्रकृति त्यांना कर्म करावयाला भाग पाडते. त्यामुळे ते सर्व जीव एक क्षणभरही कर्मरहित, नैष्कर्म्यावस्थेमध्ये राहू शकत नाहीत.
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
- हरी ॐ

No comments:

Post a Comment