Wednesday, June 5, 2013

भक्तिच्या दोन व्याख्या (Devotion - Bhakti, defined)

भगवान नारदमहर्षि भक्तीची व्याख्या करतात – भजनं रसनं इति भक्तिः |

परमेश्वरस्वरूपाचा, परमेश्वराच्या गुणांचा आस्वाद घेणे म्हणजे ‘भक्ति’ होय. भजन म्हणजे रसास्वाद. भक्त कीर्तनामधून, सत्संगामधून परमेश्वराच्या सगुण, साकार, मोहक, अत्यंत आकर्षक, सर्वांगसुंदर, रमणीय, प्रसन्न, आल्हाददायक रूपाचे श्रावण करून पुन्हा-पुन्हा तेच रूप आठवितो. त्यामध्ये तल्लीन, तन्मय, तद्रूप होतो. स्वतःचे देहभान विसरतो. त्याचे मन पूर्णतः विरघळून जाते. अशा उत्कट भावावस्थेतच तो ईश्वराचे सान्निध्य अनुभवतो. पुन्हा पुन्हा त्यातील आनंद मनसोक्त लुटतो. या रसास्वादालाच ‘भक्ति’ असे म्हणतात.

भक्तीचा दुसरा अर्थ सांगतात – भागो भक्तिः |

भाग म्हणजेच वाटणी. व्यवहारात ज्याप्रमाणे स्थावरजंगम संपत्तीची वाटणी केली जाते, त्याप्रमाणे परमेश्वराला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग – घटक बनविणे म्हणजे भक्ति होय.

विश्वामध्ये वाटणी करण्यासारख्या दोनच वस्तु आहेत. १) विषय, २) परमेश्वर. काही लोक विषयांचेच ‘भक्त’ असतात. मोहक विषयांच्याच आकर्षणाला बळी पडून रात्रंदिवस विषयांचेच चिंतन करतात. विषयभोगामध्येच रममाण होतात. सुरुवातीला विषयांच्यामधून सुख मिळाल्यासारखे वाटते. परंतु शेवटी विषय हेच मनुष्याच्या दु:खाला कारण होतात.

याउलट परमेश्वर हा स्वत:च आनंदस्वरूप असल्यामुळे परमेश्वराच्या प्राप्तीने भक्ताला निरतिशय, शाश्वत, नित्य सुखाची प्राप्ति होते. म्हणून भक्ताने विषय व परमेश्वर यापैकी क्षणिक, क्षणभंगुर विषयसुखाचा त्याग करून परमेश्वरालाच निवडावे ( select करावे ). म्हणजेच परमेश्वराला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग करावे.
- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०  
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010

- हरी ॐ

No comments:

Post a Comment