श्रीमद्भभागवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात -
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे ||
सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाशासाठी तसेच, धर्माच्या
संस्थापनेसाठी परमेश्वर प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. अवतार ही कल्पना नाही
तर संपूर्ण विश्वाच्या सुव्यवस्थेसाठी, धर्मरक्षणासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी
असणारी सृष्टीची व्यवस्था आहे.
आज वैशाख शुद्ध पंचमी ! भगवद्पुज्यपाद आदि शंकराचार्य जयंती
! आचार्यांचा जन्म हा युगप्रवर्तक जन्म आहे. आदि शंकराचार्य
म्हणजे साक्षात् शिवाचा अवतार ! स्कन्दपुराणामध्ये शिव स्वत:च सांगतात -
मदंशजानं देवेशि कलौ अपि तपोधनम् |
केरलेषु तदा विप्रं, जनयामि महेश्वरि ||
शिवावतार असणाऱ्या आचार्यांचा हा युगावातर आहे. वैदिक
धर्माची ज्योती आपल्या युगप्रवर्तक हातांनी त्यांनी सतत प्रज्वलित ठेवली.
काळ बदलला, विश्व बदलले. विज्ञानाने नवनवीन शोध लावले,
सुखसोयींची साधने बदलली, मनुष्याच्या जीवनपद्धती बदलल्या. असं सर्व काही बदलत
असताना या सर्वांची प्रतिष्ठा ज्यामध्ये आहे, असा आर्य सनातन वैदिक धर्म मात्र
बदलला नाही. अनादी काळापासून या वैदिक संस्कृतीवर अन्य धर्मियांचे अनेक आघात झाले
परंतु वैदिक धर्माच्या मुलतत्वांना कणभर देखिल क्षति पोहोचली नाही.
आदि शंकराचार्यांनी आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या
आयुष्यामध्ये वैदिक धर्माचे रक्षण केले. वेदांच्यामधील, उपनिषदांच्या मधील गूढ
तत्वज्ञान सामान्य मनुष्याला समजेल अशा पद्धतीने आपल्या भाषांच्यामधून,
प्रकरणग्रंथांच्यामधून व अनेक सुंदर स्तोत्रांच्यामधून कथन केले.
धर्मरक्षणासाठी भारतामध्ये चार दिशेला चार धर्मपीठे स्थापन
करून त्यांची कार्यव्यवस्था सर्वासंगपारित्यागी विरक्त संन्याशांकडे सोपविली.
त्रिविध तापांनी होरपळलेल्या, दु:खग्रस्त नैराश्याने विफल, उद्विग्न, मोहग्रस्त,
शोकाकुल, मनुष्यासाठी आचार्यांचे तत्वज्ञान हे यावश्र्चन्द्रदिवाकरौ
दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, आदि शंकराचार्य
जयंती १५ मे २०१३, श्रुतिसागर आश्रम.
- हरी ॐ –
No comments:
Post a Comment