Tuesday, June 11, 2013

सद्गुरूंची भेट | Advent of Sadguru

 
विश्वामधील सर्व प्रकारचे ज्ञान स्वसामर्थ्याने, स्वत:च्या बुद्धिकौशल्याने प्राप्त झाले तरीही आत्मस्वरूपाचे ज्ञान मात्र गुरूंच्या कृपेशिवाय, अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही.
 
एक साधु म्हणतात – अज्ञान व्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी
                  न च आश्रय कोठे दिसतो मज अंधारी |
                  तव दर्शन होता चिंता सारी सरली
                  नतमस्तक होता वृत्ति सुखमय झाली ||   (श्री यति नारायणानंद)
 
वर्षानुवर्षे, जन्मानुजन्मे आपण अंधारामध्येच, अज्ञानामाध्येच भ्रमण करतो. अंधारामध्ये लहान बालक जसे आपल्या आईला शोधते त्याप्रमाणे आपण मोठी बालकेही जीवनभर कोठेतरी आधार, आश्रय शोधण्याचा प्रयत्न करतो. विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीचा मी आश्रय घेतो. आपल्याला तात्पुरता आधार वाटतो. परंतु काळाच्या ओघात तो आश्रय संपतो. एकेक आश्रय गळून पडतात. आपल्या पायाखालील वाळू सरकते. आपले मन निराश होते.
 
आपल्याला ‘आपले’ असे कोणीच भेटत नाही. प्रत्येक व्यक्ति स्वत:चा स्वार्थ पूर्ण झाला की, आपल्यापासून दूर निघून जाते. परंतु आपल्या जीवनात एखादा सोनियाचा दिनू येतो. आपण इतके दिवस शोधत होतो ती माऊली आपल्याला भेटते. गुरूंची प्राप्ति होते. सद्गुरूंचे दर्शन होते.
 
सद्गुरूंच्या केवळ दर्शनानेच आपल्या सर्व चिंता संपतात. मी माझी दु:खे विसरतो. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझा सर्व भार त्यांच्यावर सोपवून मी निश्चिंत, शांत होतो. लहान बालकाला जशी हरविलेली माता सापडते त्याचप्रमाणे साधकला त्याची प्रेमळ गुरुमाऊली प्राप्त  होते. आपली वृत्ति सुखमय होते.
 
म्हणून या विश्वामध्ये गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहेत. साधकाच्या जीवनामध्ये गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हीच उपासना आणि गुरु हीच साधना आहे. गुरु ही एक व्यक्ति अथवा शरीर नसून गुरु हे स्वतःच परमेश्वरस्वरूप आहेत!
 
 
 
 
- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
 
- हरी ॐ

1 comment:

  1. Simple language and deep thought... Thanks for sharing!!!

    ReplyDelete