Wednesday, May 1, 2013

विश्वाचा नियामक – ईश्वर (God - Controller of the Universe)


हे संपूर्ण विश्व पाहताना विश्वामध्ये समन्वय व सुसूत्रता दिसते.  जसे आपण एखादे ऑफिस पाहतो.  ऑफिसमध्ये अनेक घटक, अधिकारी, पदाधिकारी, क्लर्क, नोकर असतात.  मात्र या सर्वांच्यावर नियमन ठेवणारी व्यक्ति म्हणजे मुख्य अधिकारी असतो.  घरामध्येही घर व्यवस्थित चालविण्यासाठी एक मुख्य व्यक्ति – करता पुरुष असतो.  साधी चार माणसांची जरी कंपनी चालवायची असेल तर तेथे एका नियामक शक्तीची आवश्यकता आहे.  त्याचप्रमाणे अनादि काळापासून हे विश्व जर सुसूत्रपणे चालत असेल तर यामागे सूत्रधार कोण आहे?  याचे उत्तर श्रुति देतात –

भीषास्माद्वातः पवते | भीषोदेति सूर्यः |
भीषास्मादग्निश्चेन्द्रश्च | म्रुत्युर्धावति  पञ्चम इति ||  (तैति. उप.)

विश्वामध्ये निरीक्षण केले तर एक प्रकारची नियमितता, सुसूत्रता व समन्वय दिसतो.  सूर्य रोज उगवतो, वारा वाहतो, अग्नि तप्त होतो, मृत्यूदेवता अहोरात्र धावत असते, नद्या वाहतात.  सर्व सृष्टि आपापल्या नियत कार्यात अखंडपणे, अथकपणे प्रवृत्त होते.

हे जर सत्य असेल तर आपल्या बुद्धीला मान्य केलेच पाहिजे की, या संपूर्ण विश्वाच्या मागे एक प्रचंड मोठी नियामक शक्ति आहे आणि ती शक्ति म्हणजेच ‘परमेश्वर’ होय.  परमेश्वर ही एक अदृश्य असणारी, बुद्धीच्याही अतीत असणारी अनाकलनीय शक्ति आहे.  कारणं विना कार्यं न सिध्यति | असा शास्त्राचा सिद्धांत आहे.  परमेश्वर हे या संपूर्ण दृश्य विश्वाचे कारण आहे.

‘परमेश्वर’ या शब्दामध्ये ‘ईश’ हे मूळ क्रियापद आहे.  ईशनशीलात् ईश्वरः | ‘ईश’ म्हणजेच नियमन करणे.  जो नियमन करतो, त्यास ‘परमेश्वर’ असे म्हणतात.  परमेश्वर या विश्वावर नियमन करतोच. इतकेच नव्हे, तर तो सर्व जीवांच्यावरही नियमन करतो.  म्हणून आपले जीवनही त्यानेच नियमित केलेले आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.



- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ती, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011

- हरी ॐ

No comments:

Post a Comment