Tuesday, November 24, 2015

गुरुसेवेचे महत्व | Importance of Service to Sadguru



स्वतःचा उद्धार होण्यासाठी श्रद्धा व भक्तीपूर्वक, मनोभावे गुरूंना शरण जाणे आवश्यक आहे. आचार्यांशिवाय हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान प्राप्त होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गुरूंच्याशिवाय त्या ज्ञानाचे फळ म्हणजे शांति, तृप्ति मिळत नाही. गुरुचरणी समर्पण कसे व्हावे ?

गुरुसेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा हा अर्थ नव्हे, कारण गुरुप्राप्ति होईपर्यंत साधकाने ईश्वराची पूजा, त्याची सेवा, भक्ति व उपासना करावी. सगुण, साकार इष्ट देवतेवर त्याची पूर्ण श्रद्धा व अढळ निष्ठा असते. त्याच्यासाठी ईश्वर हाच कर्तुम्-अकर्तुम्, सर्वश्रेष्ठ असतो. तो निःशंकपणे कायावाचामनासा एकनिष्ठेने ईश्वराची सेवा करतो. वाचेने परमेश्वराचे कल्याणगुण व त्याचा महिमा भजनपूजनात गातो आणि मनाने त्याचेच रूप आठवतो, परमेश्वराचे स्मरण करतो. शेवटी या ईश्वरसेवेचे फळ म्हणून त्याला गुरुप्राप्ति होते.

शिष्याने रोज गुरुचरणांची सेवा करावी. शिष्याने सेवावृत्तीने रहावे. गुरुसेवेत “चरण” हा शब्द खास करून आला आहे. चरणसेवा म्हणजे गुरूंच्या ठिकाणी साधकाने अत्यंत नम्र व विनयशील रहाणे होय, कारण ईश्वररूप गुरुचरणाशी शिष्याने पूर्णपणे समर्पण व्हावे. चरणसेवा ही नम्रतेचे प्रतीक आहे.

गुरूंना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करावा. येथे केवळ शारीरिक समर्पण अभिप्रेत नसून, गुरुचरणाशी अहंकाराचे समर्पण करावे व तेच खरे समर्पण होय. त्यामुळेच शिष्याच्या वृत्तीत नम्रता व विनयशीलता प्राप्त होते आणि ज्ञानप्राप्तीच्या साधनेतील सर्व प्रतिबंध, अहंकार समर्पणामुळे आपोआप नाहीसे होतात. गुरुसेवा हेच त्याचे ध्येय ! गुरु हेच त्याचे आश्रयस्थान ! गुरुसेवा हेच त्याचे जीवन.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

Friday, November 20, 2015

आत्मकल्याण हेच परमकर्तव्य | Self Upliftment - Supreme Duty


संसारोऽयमतीव विचित्रः | खरोखरीच हा संसार विलक्षण व विचित्र आहे.  आपण मनुष्य प्राणी खरेतर या विश्वात आगांतुक आहोत याची सतत जाणीव ठेवली पाहिजे.  विश्वाच्या रंगभूमीवरील आपण माणसे विविध भूमिका पार पाडण्यासाठी येतो.  त्यामुळे आपण आपली भूमिका करावी, अगदी चोखपणे व बिनतक्रार !  नाटकातील पात्रे काही काळ विविध प्रसंग रंगवत खेळ खेळतात व खेळ मोडून काळाच्या पडद्याआड निघून जातात, तसेच हे मानवी जीवन आहे.  हेच जीवनाचे रहस्य आहे.

शांतपणे विवेकपूर्ण विचार केला तर स्पष्टपणे ध्यानात येते की आपण मनातील खुळ्या, वेड्या कल्पनेतून नाती निर्माण करतो व विविध प्रकारच्या आसक्तीच्याही कल्पना निर्माण करतो.  अशा प्रकारे जीवनभर कल्पनांच्या न सुटणाऱ्या घट्ट जाळ्यात अडकून, जीव घुसमटून, गुदमरून मनुष्य स्वतःचा नाश आपणहून ओढवून घेतो.  परंतु तीव्र आत्मेच्छा निर्माण झाली की माणसाचे मन आपोआपच या कल्पनांच्या जाळ्यातून बाहेर येते, आसक्तीतून अलिप्त होते.

यासाठी यावज्जीव श्रुति म्हणते, ही आत्मेच्छेची अवस्था येईपर्यंत अविरत कर्म करत रहा, अहः  अहः संध्यां उपासीत |  त्याचप्रमाणे ती श्रुति वेदात दुसरीकडे असाही आदेश देते, यत् अहरेव विरजेत् तत् अहरेव प्रव्रजेत् |  ज्या दिवशी व ज्या क्षणी मनात विरक्ति येईल, त्याच क्षणी विश्व, विषय, नाती यांचा पूर्ण त्याग करावा व आत्मेच्छा पूर्तीसाठी, “ संन्यस्य श्रवणं कुर्यात् |  सर्व कर्मांचा संन्यास घेऊन शास्त्रश्रवण करावे, कारण “ आत्मकल्याणं एव कर्तव्यम् ” आत्मकल्याण हेच परमकर्तव्य आहे.

त्यासाठी साधनेने मन अंतर्मुख करून ही आत्मेच्छा दृढ करावी.  यासाठी विश्वाचे खरोखर वास्तविक स्वरूप काय आहे ?  याचा “ मनसि विचिन्तय वारं वारम् | ” पुन्हापुन्हा विचार करावा.  विश्वाची निष्फळता, व्यर्थता कळली, मनात पक्की रुजली की मन सहज आसक्तीचा त्याग करेल.

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, November 10, 2015

गीतोपदेशाचे खरे अधिकारी - २ | Eligibility for Learning Geeta - 2


जो मनुष्य भौतिक जीवन जगत असताना आपले मन आणि बुद्धि पूर्वग्रहदूषित न ठेवता, मोकळ्या मनाने (Open Mind) बाह्य जगाचे, विषयांचे, उपभोगांचे निरीक्षण करतो आणि वैचारिक जीवन जगतो त्याला आपोआपच बाह्य विषयांच्या मर्यादा, त्यांचे क्षणभंगुरत्व तसेच हे सर्व विषय आपल्याला सुखी आणि आनंदी करण्याऐवजी अधिक दुःख, विवंचना, चिंता, उद्विग्नता, निराशाच देतात हे समजते. सुख लेशमात्रही मिळत नाही.  हे पाहून त्याचे विषयांचे आकर्षण कमी होते.

तो अधिक अंतर्मुख होतो आणि त्याला समजते की, आपले मनच आपल्याला दुःखी करीत आहे.  मनच आपल्या सर्व विक्षेपाचे, द्वन्द्वांचे कारण आहे.  आपलेच मन आपल्याला सर्व बाह्य विषयांची उपलब्धता असूनही सुखाने, शांतीने जगू देत नाही.  मनामध्ये असलेले कामक्रोधादि विकारच सारखे आघात करून आपल्या जीवनातील खरी शांति हिरावून नेतात.

या कामक्रोधादि विकारांच्या जबड्यामधून सुटल्याशिवाय खरी शांति मिळणार नाही.  त्यामुळे तो अत्यंत अगतिक होतो.  अंतरिक शांति कशी मिळेल, हाच एक त्याचा खरा प्रश्न राहतो.  बाकी सर्व प्रश्न आपोआपच गळून पडतात.  हा जीवनाचा मूलभूत प्रश्न ज्याला समजलेला असून त्यामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो तोच खरा साधक आहे.  मुमुक्षु आहे.

तो अर्जुनाप्रमाणे काहीही मागत नाही.  फक्त मागतो ती आत्मशांति !  तोच अर्जुनाप्रमाणे गीतोपदेशाचा खरा अधिकारी आहे.  अशा जीवाने आत्मशांतीसाठी अर्जुनाप्रमाणे गुरूंना शरण जावे.  ते गुरु त्याला भगवंताप्रमाणेच उपदेश देतील.  म्हणून सर्व मानवजातीला अनंतकाळापर्यंत उपदेश करणारी, दीपस्तंभाप्रमाणे दिशा देणारी, मार्गदर्शन करणारी, जीवन परमशांतीने भरून तृप्त करणारी ही श्रीमद्भगवद्गीता आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, November 3, 2015

गीतोपदेशाचे खरे अधिकारी - १ | Eligibility for Learning Geeta - 1


गीतेचा उपदेश वास्तविक अर्जुनाला केलेला असेल तरी प्रत्येक जीवाला केलेला आहे, कारण अर्जुनाने विचारलेला प्रश्न हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न नसून तो सर्वांचा आहे.  तो सर्व मानवजातीचा आहे.  तो कोणत्याही काळातील प्रत्येक मनुष्याचा प्रश्न आहे.  अर्जुनाची मानसिक स्थिति आणि त्याने अनुभवलेला असह्य, व्याकूळ करणारा अंतरिक शोक आणि मोह, आजही आधुनिक काळामध्ये प्रत्येक मनुष्य अनुभवत आहे.  आजचा बुद्धिमान मानवही अनेक प्रकारची मानसिक द्वन्द्व, संघर्ष अनुभवतो.

अर्जुनाची युद्धभूमीवर जी अवस्था झालेली होती तीच आज आमचीही आहे.  त्यामुळे काळ बदलला तरी दोघांच्या अंतरिक अवस्थेमध्ये काहीच फरक नाही.  अर्जुनाप्रमाणे आम्ही सर्व गीतेच्या उपदेशाचे अधिकारी आहोत.  तेथे वर्ण, आश्रम, धर्म, जात, पंथ, उच्च, नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, श्रीमंत-गरीब कोणताच भेद नाही.  धर्म, राष्ट्र यांच्याही मर्यादा नाहीत.  थोडक्यात प्रत्येक मनुष्य गीतेचा अधिकारी आहे.

दुर्दैवाने प्रत्येक मनुष्य दुःखाचे, शोकाचे कारण बाहेर शोधत असतो आणि विषयांची पुन्हा पुन्हा नवीन नवीन मांडणी करून, प्रसंग, विषय, माणसांना टाळून किंवा अदलाबदल करून दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो.  या लोकांना दुःखाचे निश्चित कारणच सापडलेले नाही.  अंतर्मुख होऊन विचार करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये असत नाही.  त्यामुळे ते जीवन जगत असले तरी ते खरे साधकच नाहीत.  ते फक्त पशुप्रमाणे विषयांतच रमतात.  विषय हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम साध्य राहाते.  म्हणून याप्रकारचे लोक गीतोपदेशाचे खरे अधिकारी होऊ शकत नाहीत.

क्रमशः ...


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ