ज्ञानी पुरुष स्वतःच्या मनामधील पूर्वग्रहदूषित कल्पना, रागद्वेष, कलुषितता काढून
अत्यंत शुद्ध, स्वच्छ, रागद्वेषरहित मनाने विश्वाकडे पाहातो. त्याला सर्व विश्वामध्ये शुद्धतेची, मांगल्याची,
पावित्र्याची अनुभूति येते. तो शीत-उष्ण, सुख-दुःख या सर्व द्वन्द्वांच्यामध्ये
समतोल राहातो. तोच 'सङ्ग्विवर्जितः' होतो.
असंगस्वरूप होतो. याठिकाणी आचार्य प्रथम 'संग' या शब्दाचा अर्थ सांगतात.
मान-अपमान, शीत-उष्ण वगैरेदींचा अनुभव अहंकार
घेतो. हा अहंकार साभास म्हणजेच अज्ञानजन्य
असून मिथ्या स्वरूपाचा आहे. अहंकाराला स्वतःची
स्वतंत्र सत्ता नाही. अशा मिथ्या, भासात्मक
अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळेच मी कर्ता-भोक्ता, सुखी-दुःखी, जन्ममृत्युयुक्त, संसारी
हे सर्व अध्यास निर्माण होतात. या अध्यासालाच
'संग' असे म्हणतात.
अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळेच जीव संसाराचा,
सुख-दुःखांचा अनुभव घेतो. वास्तविक पाहाता
अहंकार सुद्धा मिथ्या, भासात्मकच आहे. आत्मचैतन्यामध्येच
आश्रित, अध्यस्त आहे. अहंकाराला स्वतःची स्वतंत्र
सत्ता नसून ती आत्मचैतन्याचीच सत्ता आहे. आत्मचैतन्याच्या
सत्तेमुळेच अहंकाराचे रक्षण, वर्धन, पोषण होते. हा जसा जसा वाढायला लागतो तसतसा तो आपल्या अधिष्ठानाला
- आत्मचैतन्याला विसरतो. प्रत्येक प्रसंगामधून
सतत 'मी' - 'मी' असे अस्तित्व दर्शवितो.
एखादे भूत जसे हात धुऊन मागे लागते तसेच प्रत्येक
जीवाच्या मागे अहंकाररूपी भूत लागलेले आहे. हा अहंकार मनुष्याला गुलाम बनवून नाचवितो, भ्रमिष्ट
करतो. स्वस्वरूपापासून च्यूत करून मनुष्याचा
नाश करतो. मनुष्याभोवती कल्पनांचे जाळे तयार
करून त्या जाळ्यामध्ये घट्ट अडकवितो. क्षणाक्षणाला
उफाळून बाहेर येतो. त्या अहंकाराशी तादात्म्य
पावणे म्हणजेच 'संग' आहे. परंतु अहंकाराशी
जो तादात्म्य पावत नाही तोच 'सङ्ग्विवर्जित', ज्ञानी पुरुष आहे. तो आत्मज्ञानाच्या
सामर्थ्याने अज्ञानाचा ध्वंस करून अहंकाराचा पूर्णतः निरास करतो. यामुळे अहंकारामधून निर्माण झालेल्या मान-अपमान,
सुख-दुःख या कल्पनांचाही पूर्णतः निरास होतो. तोच सङ्ग्विवर्जित, संगरहित होतो. त्याचा अहंकार म्हणजेच 'कार' प्रत्यय निरास झाल्यामुळे
राहाते ते असंगस्वरूप, आत्मस्वरूप ! त्या स्वरूपामध्ये
स्थिर झाल्यामुळे तो समदर्शी होतो. त्याचा
अहंकार पूर्णतः गळून पडतो. विरून जातो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami
Swaroopanand Saraswati, 3rd Edition,
December 2002
- हरी ॐ–