Tuesday, April 29, 2025

सत्संग मिलना मुष्किल है | Satsang Is Rare

 




व्यवहारामध्ये काही प्राप्त करावयाचे असेल तर आपल्याला मोठे कष्ट पडतात.  जसे एखाद्या व्यापाऱ्याला समजले की, या व्यवहारात त्याचा नफा होणार आहे, तर तो ते हजार दोन हजार रुपये मिळविण्यासाठी पाहिजे ते कष्ट करतो.  कोठेही जायला तयार होतो.  प्रयत्न-परिश्रम करून तो ते प्राप्त करतो.  तसेच हे रामा !  साधकाने सुद्धा कोठे सत्संग मिळणार असेल तर कितीही कष्ट पडले तरी त्याचा त्याग करू नये.

 

याचे कारण आपल्या आयुष्यात सत्संग हा अत्यंत दुर्लभ आहे.  आपणास धन, पैसा, पुत्र, पौत्र, सत्ता सर्व काही मिळेल.  म्हणून म्हटले जाते - और सभी मिल जाएगा |  सत्संग मिलना मुष्किल है |  सत्संग मिळणे मात्र अत्यंत कठीण आहे.  आपल्या जीवनामध्ये गुरूंची प्राप्ति होणे, गुरूंचा सहवास लाभणे, त्यांचा उपदेश मिळणे अत्यंत दुर्लभ आहे.  म्हणून ज्यावेळी असा सत्संग मिळेल, त्यावेळेस एक क्षणभरही त्याचा त्याग करू नये.

 

सामान्य मनुष्य पुष्कळ वेळेला विचार करतो की, आता एवढे कर्तव्य पार पडले, मुलांची शिक्षणे झाली, लग्नकार्ये पार पाडली, नोकरीमधून निवृत्त झालो की, मग मी सत्संगाला जाईन.  परंतु शास्त्रकार सांगतात की, मनुष्यजन्म तर दुर्मिळ आहेच.  परंतु आपल्याला मिळालेले शरीर सुद्धा अत्यंत क्षणिक व नाशवान आहे.  हा सगळा संसारच त्रिविध तापांनी अनेक दुःखांनी व असंख्य अनर्थांनी भरलेला आहे.  या भयंकर संसारसागरामधून पार होण्यासाठी जणु काही शरीररूपी नौका आपल्याला मिळाली आहे.  या शरीररूपी नौकेला नवद्वाररूपी छिद्रे आहेत.  तसेच मृत्यु केव्हा या शरीराला घेऊन जाईल, याचीही शाश्वती नाही.

 

एका क्षणार्धात काळ आपल्यापासून शरीरासह सर्व काही हिरावून घेतो.  म्हणून या दुर्लभ मनुष्यजन्माचा उपयोग जर मुक्तीसाठी केला नाही तर मनुष्याचा महान नाश आहे.  म्हणून रामा !  साधकाला भवसागर तरून जाण्यासाठी सत्संगरूपी ही नौका आहे.  अशा या सत्संगापासून क्षणभरही दूर राहू नये.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, April 22, 2025

सत्य-तपस्-ज्ञान-ब्रह्मचर्य | Truth-Penance-Knowledge-Celibacy

 



श्रुति साधकाला ज्ञानासाठी साहाय्कारी असणारी साधने सूचित करते.  जर यथार्थ आणि सम्यक् ज्ञान प्राप्त करावयाचे असेल, तर ज्ञान निष्प्रतिबंधक झाले पाहिजे.  त्यासाठी अंतःकरणामधील मल, विक्षेपादि दोष नाहिसे होणे आवश्यक आहे.  म्हणूनच श्रुति येथे निवृत्तिप्रधान असणारी सत्यादि साधने प्रतिपादित करते की, ज्या साधनांच्यामुळे साधक बाह्य विषय आणि भोगांच्यामधून निवृत्त होऊ शकेल.

 

सत्य हे प्रथम साधन सांगतात.  हा आत्मा सत्याने प्राप्त होतो.  सत्य म्हणजेच सत्यभाषण होय.  ज्या वाणीमध्ये सत्याच्या व्यतिरिक्त असणारे म्हणजेच जे जे असत्य, अनृत, मिथ्या, निरर्थक आहे, त्यांचा अभाव असतो.  त्यास ‘सत्य’ असे म्हणतात.

 

तप हे दुसरे साधन सांगतात.  तपाने आत्मा प्राप्त होतो.  मन आणि पंचकर्मेंद्रिये आणि पंचज्ञानेंद्रिये यांना एकाग्र करणे, हेच सर्वश्रेष्ठ तप आहे.  तप याचा अर्थच मन आणि इंद्रिये यांचा स्वैर, बहिर्मुख प्रवृत्तीवर पूर्णतः नियमन करून त्यांना अंतर्मुख व एकाग्र करणे होय.  हेच तप म्हणजेच शम व दम हे दोन दैवी गुण आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अनुकूल आहेत.  या अंतरिक तपानेच आत्मप्राप्ति होते.

 

यापुढील साधन सांगतात सम्यक् ज्ञानेन |  सम्यक् ज्ञान म्हणजेच यथार्थ, संशयविपर्ययरहित ज्ञान होय.  अशा जीवब्रह्मैक्यज्ञानाने आत्मप्राप्ति होते.  ज्ञान हेच आत्मप्राप्तीचे पुष्कल व प्रधान साधन आहे.

 

यापुढील साधन सांगतात – नित्यं ब्रह्मचर्येण |  ब्रह्मचर्य याचा अर्थ इंद्रियांच्या कामुक प्रवृत्तीवर नियमन करणे, मैथुनाचा त्याग करणे होय.  जे साधक, यति सत्य वगैरेदि साधनांचे सातत्याने, दीर्घ काळ अनुष्ठान करतात, कोणत्याही प्रकारचा प्रमाद, टाळाटाळ, दुर्लक्ष न करता अखंडपणे साधनेमध्ये तत्पर व परायण होतात, त्यांच्या अंतःकरणामधील कामक्रोधादि सर्व दोष नष्ट होतात.  त्यांचे अंतःकरण शुद्ध, सत्वगुणप्रधान होते.  तेच यति त्या आत्मस्वरूपाला अपरोक्षस्वरूपाने पाहतात, स्पष्टपणे जाणतात.  असे याठिकाणी श्रुति प्रतिपादित करते.  म्हणून सत्य, तपस्, ज्ञान व ब्रह्मचर्य यामध्ये साधकांनी नित्यनिरंतर प्रवृत्त व्हावे, त्यामध्येच तल्लीन, तन्मय व्हावे हाच अभिप्राय आहे.  अशा प्रकारे श्रुति येथे सत्यादि साधनांची स्तुति करते.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, April 15, 2025

स्वस्वरूपाची अनुभूति | Self Experience

 



परमात्मस्वरूप हे स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशस्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार असू शकत नाही.  ते स्वरूप आकाशाप्रमाणे निराकार आहे. परमात्म्याचा प्रकाश म्हणजे त्याचा साक्षात अनुभव होय.  अन्य कोणत्याही साधनाने त्याचा अनुभव येत नाही.  ते स्वरूप अंधार आणि प्रकाशरहित व जरारहित आहे.  ते आकाशाप्रमाणे असून त्याने संपूर्ण जगताला अंतर्बाहय व्याप्त केले आहे.

 

या दोन श्लोकांच्यामधून श्रीवसिष्ठमुनि सांगतात की, त्या तत्त्वाची अनुभूति अन्य बाह्य दृश्य विषयांच्याप्रमाणे येत नाही.  तर ती अनुभूति स्वतःच्या साहाय्याने स्वतःमध्येच येते.  बाह्य अनुभवांच्यामध्ये अनुभवणारा 'मी' असतो व अनुभवण्याची वस्तु दृश्य असून ती माझ्यापासून भिन्न असते.  आपण त्या वस्तु सहजपणे डोळ्यांनी पाहू शकतो. जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्या सूक्ष्म वस्तु सूक्ष्मदर्शीने पाहतो.  सुखदुःखादि विषय मनाने अनुभवतो.  परंतु आत्मानुभूतीमध्ये अनुभवण्याची वस्तु 'मी' आहे आणि अनुभवणारा सुद्धा 'मी'च आहे.  त्यामुळे मन, बुद्धि हे सुद्धा आत्मानुभूतीचे साधन होऊ शकत नाहीत.  तर ही अनुभूति स्वतःच स्वतःने व स्वतःमध्येच घ्यावयाची आहे.

 

"याप्रमाणे आत्मस्वरूप हे शून्य-अशून्याच्या अतीत, आकाशाप्रमाणे अतिशय स्वच्छ, अंधार आणि प्रकाशाच्या अतीत असणारे अजर पद आहे.  जसे सर्वव्यापी आकाशामध्ये कोणताही दोष संभवत नाही, त्याचप्रमाणे या पारमार्थिक स्वरूपामध्ये ना कोणता विकार आहे, ना प्रकाश आहे, ना अंधार आहे, ना ज्ञान आहे, ना अज्ञान आहे !  असे ते स्वरूप अजर, अमर, अविकारी, निर्लेप आहे.  रामा !  अशा स्वरूपाची अनुभूति बाहेर कोठे येणार नाही.  तर ती स्वस्वरूपाची अनुभूति आहे."

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, April 8, 2025

अद्वेष्टा | Unenvious

 



ब्रह्मज्ञानी पुरुष ‘अद्वेष्टा’ कसा होतो ?  पारमार्थिक, तात्त्विक दृष्टीने पाहिले तर ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या |  किंवा – ब्रह्म एव सत्यं अन्यत् सर्वं मिथ्या इति |  हे त्याचे निश्चित, निःसंशय, स्पष्ट ज्ञान असते.  या दृष्टीमध्ये तो फक्त निर्गुण, निर्विशेष परब्रह्मस्वरूप पाहातो.  त्याव्यतिरिक्त काहीही पाहत नाही कारण – अन्यवस्त्वन्तराभावात् |  

यत्र नान्यपश्यति नान्यत्श्रुणोति नान्यत् विजानाति इति |              (छांदो. उप. ७-२४-१)

 

ब्रह्मस्वरूपाव्यतिरिक्त तो अन्य काहीही पाहात नाही, ऐकत नाही आणि जाणतही नाही.  या अधिष्ठानाच्या ज्ञानामुळे अध्यस्त असणाऱ्या सर्व विश्वाचा, भूतमात्रांचा, नामरूपांचा निरास होतो.  ज्याप्रमाणे आरशामध्ये दिसणारी नगरी ही सत्य नसून मिथ्या, भासात्मक, कल्पित आहे.  तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून आरशाच्या अधिष्ठानामध्ये ती अध्यस्त आहे.  म्हणून आरसा – अधिष्ठानच फक्त सत्य आहे.  अन्य सर्व दृश्य नगरी भासात्मक आहे.

 

त्याचप्रमाणे नानात्व-अनेकत्वाने प्रचीतीला येणारे हे दृश्य विश्व, सर्व भूतमात्रे परब्रह्मस्वरूप अधिष्ठानामध्ये अस्तित्वात असून ती मिथ्या, कल्पित आहेत.  त्यांना स्वतःची सत्ता नाही.  या सर्व विश्वामध्ये परब्रह्मस्वरूपच सत् स्वरूपाने अनुस्यूत आहे.  नव्हे, परब्रह्मानेच हे सर्व चराचरात्मक, स्थावरजंगमात्मक विश्व अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे.  यामुळे मी – परब्रह्म आणि विश्व यामध्ये भेद नसून एकत्व – अद्वयत्व आहे.  मग कोण कोणाचा द्वेष करणार ?  हा प्रश्नच आहे, कारण द्वेष करण्यासाठी दोन भिन्न व्यक्तींची आवश्यकता आहे.  एक दुसऱ्यापासून भिन्न असेल तरच परस्परांविषयी द्वेषभावना निर्माण होऊ शकते.  माझ्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच नसेल तर द्वेष करताच येणार नाही.  द्वेषासंभवात् |  तो ज्ञानी पुरुष रागद्वेषरहित असतो, असे भगवान सिद्ध करतात.  म्हणूनच तो “सर्वभूतानां अद्वेष्टा” होतो.

 

असा हा ज्ञानी पुरुष रागद्वेषरहित झाल्यामुळे मोक्षप्राप्तीमधील सर्व प्रतिबंध नाहीसे होऊन तो एकदम (direct) मला – परमात्मस्वरूपाला प्राप्त होतो.  माझ्या स्वरूपाला येण्यासाठी त्याला सर्व दरवाजे आपोआपच खुले होतात आणि तो अनायासाने मला प्राप्त करतो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, April 1, 2025

सत्संग - एकमेव महान औषध | Satsang - The Only Great Medicine

 




सत्संगाच्या प्रभावाने संकटे जणु काही थिजून जातात.  जोपर्यंत आपण सत्संगामध्ये आहोत, ईश्वराचे संकीर्तन, भजन ईशकथा श्रवण करीत आहोत, तोपर्यंत तेथे यमराज सुद्धा प्रवेश करू शकत नाहीत.  जेथे साधु आहेत तेथे संकटे येऊ शकत नाहीत. जेथून साधु पुरुष - संत पुरुष दूर जातात, तेथे अनर्थ घडु लागतो.  मात्र जेथे संत आहेत, जेथे सत्संग आहे, तेथे संकटे आली तरी ती निघूनही जातात.  जसे बर्फ कमळाच्या फुलाला थिजवून टाकते, तसेच सत्संगामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांची ताकद निघून जाते.  संकट हे संकट वाटत नाही.

 

वाऱ्याने जसे धुके क्षणार्धात नष्ट होऊन समोरचे स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे सत्संगामुळे विषयमोहाचे धुके क्षणार्धात नष्ट होते.  सत्संगामध्ये विषयांचे आकर्षण, भोगासक्ति नाहीशी होते.  म्हणून जगात सर्व संकटे आणि सर्व मोह यांना पराभूत करून विजयी होणारा सत्संगच आहे.

 

असा हा सत्संग मनुष्याच्या बुद्धीचे वर्धन करतो.  अज्ञानरूपी वृक्षाचा समूळ छेद करतो आणि मनुष्याची सर्व मानसिक दुःखे नाहीशी करतो.  म्हणून जेथे सत्संग आहे तेथेच बुद्धीचा विकास आहे.  जसे सूर्योदय झाल्यावर विश्वामधील अंधार नाहीसा करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.  सूर्योदय होताक्षणीच अंधार आपोआपच नाहीसा होतो.  तसेच सत्संगामध्ये आपल्या बुद्धिमधील अज्ञानरूपी वृक्षाचा छेद होतो.  शिष्याच्या अंतःकरणामधील अज्ञान ज्ञानशलाकेने नाहीसे करून जे शिष्याचा ज्ञानचक्षु उघडून देतात तेच खरे गुरु होत.  इतकेच नव्हे तर मनुष्याला अनेक मानसिक व्याधि आणि या भवरोगाने जन्मानुजन्मे ग्रासले आहे.  या सर्व, दुःख, शोक, मोहात्मक रोगांचा नाश करावयाचा असेल तर सत्संग हे एकमेव महान औषध आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ