Tuesday, April 8, 2025

अद्वेष्टा | Unenvious

 



ब्रह्मज्ञानी पुरुष ‘अद्वेष्टा’ कसा होतो ?  पारमार्थिक, तात्त्विक दृष्टीने पाहिले तर ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या |  किंवा – ब्रह्म एव सत्यं अन्यत् सर्वं मिथ्या इति |  हे त्याचे निश्चित, निःसंशय, स्पष्ट ज्ञान असते.  या दृष्टीमध्ये तो फक्त निर्गुण, निर्विशेष परब्रह्मस्वरूप पाहातो.  त्याव्यतिरिक्त काहीही पाहत नाही कारण – अन्यवस्त्वन्तराभावात् |  

यत्र नान्यपश्यति नान्यत्श्रुणोति नान्यत् विजानाति इति |              (छांदो. उप. ७-२४-१)

 

ब्रह्मस्वरूपाव्यतिरिक्त तो अन्य काहीही पाहात नाही, ऐकत नाही आणि जाणतही नाही.  या अधिष्ठानाच्या ज्ञानामुळे अध्यस्त असणाऱ्या सर्व विश्वाचा, भूतमात्रांचा, नामरूपांचा निरास होतो.  ज्याप्रमाणे आरशामध्ये दिसणारी नगरी ही सत्य नसून मिथ्या, भासात्मक, कल्पित आहे.  तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून आरशाच्या अधिष्ठानामध्ये ती अध्यस्त आहे.  म्हणून आरसा – अधिष्ठानच फक्त सत्य आहे.  अन्य सर्व दृश्य नगरी भासात्मक आहे.

 

त्याचप्रमाणे नानात्व-अनेकत्वाने प्रचीतीला येणारे हे दृश्य विश्व, सर्व भूतमात्रे परब्रह्मस्वरूप अधिष्ठानामध्ये अस्तित्वात असून ती मिथ्या, कल्पित आहेत.  त्यांना स्वतःची सत्ता नाही.  या सर्व विश्वामध्ये परब्रह्मस्वरूपच सत् स्वरूपाने अनुस्यूत आहे.  नव्हे, परब्रह्मानेच हे सर्व चराचरात्मक, स्थावरजंगमात्मक विश्व अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे.  यामुळे मी – परब्रह्म आणि विश्व यामध्ये भेद नसून एकत्व – अद्वयत्व आहे.  मग कोण कोणाचा द्वेष करणार ?  हा प्रश्नच आहे, कारण द्वेष करण्यासाठी दोन भिन्न व्यक्तींची आवश्यकता आहे.  एक दुसऱ्यापासून भिन्न असेल तरच परस्परांविषयी द्वेषभावना निर्माण होऊ शकते.  माझ्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच नसेल तर द्वेष करताच येणार नाही.  द्वेषासंभवात् |  तो ज्ञानी पुरुष रागद्वेषरहित असतो, असे भगवान सिद्ध करतात.  म्हणूनच तो “सर्वभूतानां अद्वेष्टा” होतो.

 

असा हा ज्ञानी पुरुष रागद्वेषरहित झाल्यामुळे मोक्षप्राप्तीमधील सर्व प्रतिबंध नाहीसे होऊन तो एकदम (direct) मला – परमात्मस्वरूपाला प्राप्त होतो.  माझ्या स्वरूपाला येण्यासाठी त्याला सर्व दरवाजे आपोआपच खुले होतात आणि तो अनायासाने मला प्राप्त करतो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ