Tuesday, April 22, 2025

सत्य-तपस्-ज्ञान-ब्रह्मचर्य | Truth-Penance-Knowledge-Celibacy

 



श्रुति साधकाला ज्ञानासाठी साहाय्कारी असणारी साधने सूचित करते.  जर यथार्थ आणि सम्यक् ज्ञान प्राप्त करावयाचे असेल, तर ज्ञान निष्प्रतिबंधक झाले पाहिजे.  त्यासाठी अंतःकरणामधील मल, विक्षेपादि दोष नाहिसे होणे आवश्यक आहे.  म्हणूनच श्रुति येथे निवृत्तिप्रधान असणारी सत्यादि साधने प्रतिपादित करते की, ज्या साधनांच्यामुळे साधक बाह्य विषय आणि भोगांच्यामधून निवृत्त होऊ शकेल.

 

सत्य हे प्रथम साधन सांगतात.  हा आत्मा सत्याने प्राप्त होतो.  सत्य म्हणजेच सत्यभाषण होय.  ज्या वाणीमध्ये सत्याच्या व्यतिरिक्त असणारे म्हणजेच जे जे असत्य, अनृत, मिथ्या, निरर्थक आहे, त्यांचा अभाव असतो.  त्यास ‘सत्य’ असे म्हणतात.

 

तप हे दुसरे साधन सांगतात.  तपाने आत्मा प्राप्त होतो.  मन आणि पंचकर्मेंद्रिये आणि पंचज्ञानेंद्रिये यांना एकाग्र करणे, हेच सर्वश्रेष्ठ तप आहे.  तप याचा अर्थच मन आणि इंद्रिये यांचा स्वैर, बहिर्मुख प्रवृत्तीवर पूर्णतः नियमन करून त्यांना अंतर्मुख व एकाग्र करणे होय.  हेच तप म्हणजेच शम व दम हे दोन दैवी गुण आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अनुकूल आहेत.  या अंतरिक तपानेच आत्मप्राप्ति होते.

 

यापुढील साधन सांगतात सम्यक् ज्ञानेन |  सम्यक् ज्ञान म्हणजेच यथार्थ, संशयविपर्ययरहित ज्ञान होय.  अशा जीवब्रह्मैक्यज्ञानाने आत्मप्राप्ति होते.  ज्ञान हेच आत्मप्राप्तीचे पुष्कल व प्रधान साधन आहे.

 

यापुढील साधन सांगतात – नित्यं ब्रह्मचर्येण |  ब्रह्मचर्य याचा अर्थ इंद्रियांच्या कामुक प्रवृत्तीवर नियमन करणे, मैथुनाचा त्याग करणे होय.  जे साधक, यति सत्य वगैरेदि साधनांचे सातत्याने, दीर्घ काळ अनुष्ठान करतात, कोणत्याही प्रकारचा प्रमाद, टाळाटाळ, दुर्लक्ष न करता अखंडपणे साधनेमध्ये तत्पर व परायण होतात, त्यांच्या अंतःकरणामधील कामक्रोधादि सर्व दोष नष्ट होतात.  त्यांचे अंतःकरण शुद्ध, सत्वगुणप्रधान होते.  तेच यति त्या आत्मस्वरूपाला अपरोक्षस्वरूपाने पाहतात, स्पष्टपणे जाणतात.  असे याठिकाणी श्रुति प्रतिपादित करते.  म्हणून सत्य, तपस्, ज्ञान व ब्रह्मचर्य यामध्ये साधकांनी नित्यनिरंतर प्रवृत्त व्हावे, त्यामध्येच तल्लीन, तन्मय व्हावे हाच अभिप्राय आहे.  अशा प्रकारे श्रुति येथे सत्यादि साधनांची स्तुति करते.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ