व्यवहारामध्ये काही प्राप्त करावयाचे असेल तर
आपल्याला मोठे कष्ट पडतात. जसे एखाद्या व्यापाऱ्याला
समजले की, या व्यवहारात त्याचा नफा होणार आहे, तर तो ते हजार दोन हजार रुपये मिळविण्यासाठी
पाहिजे ते कष्ट करतो. कोठेही जायला तयार होतो.
प्रयत्न-परिश्रम करून तो ते प्राप्त करतो.
तसेच हे रामा ! साधकाने सुद्धा कोठे सत्संग मिळणार असेल तर कितीही
कष्ट पडले तरी त्याचा त्याग करू नये.
याचे कारण आपल्या आयुष्यात सत्संग हा अत्यंत
दुर्लभ आहे. आपणास धन, पैसा, पुत्र, पौत्र,
सत्ता सर्व काही मिळेल. म्हणून म्हटले जाते
- और सभी मिल जाएगा | सत्संग मिलना मुष्किल
है | सत्संग मिळणे मात्र अत्यंत कठीण आहे.
आपल्या जीवनामध्ये गुरूंची प्राप्ति होणे,
गुरूंचा सहवास लाभणे, त्यांचा उपदेश मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून ज्यावेळी असा सत्संग मिळेल, त्यावेळेस एक
क्षणभरही त्याचा त्याग करू नये.
सामान्य मनुष्य पुष्कळ वेळेला विचार करतो की,
आता एवढे कर्तव्य पार पडले, मुलांची शिक्षणे झाली, लग्नकार्ये पार पाडली, नोकरीमधून
निवृत्त झालो की, मग मी सत्संगाला जाईन. परंतु
शास्त्रकार सांगतात की, मनुष्यजन्म तर दुर्मिळ आहेच. परंतु आपल्याला मिळालेले शरीर सुद्धा अत्यंत क्षणिक
व नाशवान आहे. हा सगळा संसारच त्रिविध तापांनी
अनेक दुःखांनी व असंख्य अनर्थांनी भरलेला आहे. या भयंकर संसारसागरामधून पार होण्यासाठी जणु काही
शरीररूपी नौका आपल्याला मिळाली आहे. या शरीररूपी
नौकेला नवद्वाररूपी छिद्रे आहेत. तसेच मृत्यु
केव्हा या शरीराला घेऊन जाईल, याचीही शाश्वती नाही.
एका क्षणार्धात काळ आपल्यापासून
शरीरासह सर्व काही हिरावून घेतो. म्हणून या
दुर्लभ मनुष्यजन्माचा उपयोग जर मुक्तीसाठी केला नाही तर मनुष्याचा महान नाश आहे. म्हणून रामा ! साधकाला भवसागर तरून जाण्यासाठी सत्संगरूपी ही नौका
आहे. अशा या सत्संगापासून क्षणभरही दूर राहू
नये.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–