गुरूंचा महिमा, गुरूंचे माहात्म्य, अगाध, अपार,
अनाकलनीय आहे. सर्व शास्त्र, पुराणे, आचार्य
त्यांचा महिमा गातात. सद्गुरू शरण आलेल्या
शिष्याला घडवीत असतो. ते जीवनाला निश्चित दिशा
देतात. त्यांच्याच कृपेमुळे आपण जीवनात निश्चित
काय शोधत आहोत, आपले अंतिम साध्य काय आहे ते समजते. त्यांच्याच कृपेमुळे आपल्या जीवनात आत्मविश्वास,
श्रद्धा, निष्ठा, धैर्य, निःस्वार्थ सेवा, त्याग भक्ति वगैरे वृत्तींचा उत्कर्ष होतो.
आपले मन विषयांच्यापासून निवृत्त होऊन हळूहळू
ईश्वराभिमुख होते. अंतर्मुख होते. प्रत्येक कर्मामधून ईश्वराची, गुरूंची सेवा घडते.
त्यांच्याच संगाने आमच्या मनातील राग-द्वेष,
कामक्रोधादि विकार कमी होतात. चित्त शुद्ध,
निर्मळ होते. आमच्या साधनेमध्ये सातत्य, नियमितपणा
येतो.
सद्गुरूंच्याच कृपेमुळे जीवनात येणाऱ्या
सर्व संकटांच्यामधून, अडचणींच्यामधून, आपत्तीमधून साधक पार होतो. बाह्य प्रसंग मन विचलित करीत नाहीत. सर्व बाह्य विषयांची, व्यवहाराची निष्फळता समजावयास
लागते आणि ईश्वरविषयीचे प्रेम, ओढ वाढते. परमेश्वराचे चिंतन अखंड होते आणि शेवटी त्यांच्याच
उपदेशाने अंतरंगामध्ये असलेला अज्ञानाचा अंधार नाहीसा होऊन आत्मप्रचीति येते. जीवनामध्ये परमोच्च आनंदाची अनुभूति येते. जीवन पूर्ण होते. तृप्त होते.
म्हणून सद्गुरुंचे सान्निध्य आणि त्यांची
कृपा ही परीसापेक्षाही अधिक आहे. परीस फक्त
लोखंडाचे सोने करतो परंतु त्याला लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य देत नाही. सद्गुरू मात्र शिष्याला स्वतःचे आत्मस्वरूप देऊन
सद्गुरू बनवितात. खरोखर त्यांची किमया अगाध
आहे. अपार आहे. म्हणूनच सर्व संत म्हणतात. आम्ही बी घडलो । तुम्ही बी घडाना । नारदमहर्षि म्हणतात ते त्रिवार सत्य आहे. महत्सङ्गःस्तु दुर्लभोऽग्यम्योऽमोघश्च |
थोडक्यात महात्म्यांच्या संग अत्यंत दुर्लभ,
अगम्य आणि अमोघ आहे. त्यांच्या कृपेनेच परमप्रेमरूपा,
अमृतस्वरूपा न कामयमाना भक्ति आपण प्राप्त करू शकतो. म्हणून तप, यज्ञ, याग, पूजा, अर्चना करून घरादाराचा
त्याग करून सुद्धा जी भक्ति आपण प्राप्त करू शकत नाही ती भक्ति गुरुकृपेमुळे, संतकृपेमुळे
मिळते. महात्म्यांच्या चरणरजांच्या
अभिषेकाने, त्यामध्ये लोळल्याने, त्यांच्या पवित्र स्पर्शाने आपल्या हृदयात ईश्वराचे
प्रेम उदयाला येते. यासाठी महात्म्यांच्या
संग, त्यांची कृपा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. बाकी काहीही करू नये, कारण भक्ति स्वतःच्या प्रयत्नाने
मिळत नाही.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –