Tuesday, August 25, 2015

मनुष्य जीवनाचा यज्ञ | Yajnya of Human Life


देवांचा मानसिक यज्ञ सांगण्यामागे श्रुतीला केवळ बाह्य यज्ञ किंवा कर्मकांड अपेक्षित नसून साधकाला यामधून काहीतरी श्रेष्ठ सांगावयाचे आहे. आपले संपूर्ण जीवनच यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नसून यज्ञ म्हणजे अर्पण करणे आहे.

यज्ञामध्ये सतत तूप घालावे लागते. या व्यष्टि यज्ञात तूप म्हणजे स्निग्धता, स्नेहभाव, ममत्व. हा ममत्वभाव यज्ञात अर्पण केला तरच ज्ञानाग्नि प्रज्वलित होतो. आज साधकाच्या अंतःकरणामध्ये विषय, व्यक्तींविषयी ममत्व असल्यामुळे हा माझा, हा परका ही कूपमंडुक वृत्ति निर्माण होते. फक्त माझे घर, माझी मुले, इतकीच सीमित दृष्टि बनते. मात्र, ज्ञानाग्नि प्रज्वलित करावयाचा असेल तर ममत्वरूपी तूपाचे सतत समर्पण केले पाहिजे.

ग्रीष्म ऋतु म्हणजे कडक उन्हाळ्यात झाडांच्या फांद्या वाळतात व त्याच नंतर समिधा म्हणून वापरतात. या समिधा म्हणजेच अंतःकरणातील वासना होत. प्रथम या समिधा ओल्या, स्निग्ध असतात. त्यांना शुष्क करण्यासाठी उन्हाळा आवश्यक आहे. साधकाच्या जीवनात प्रखर वैराग्याशिवाय साधना शक्य नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

शरद ऋतु हा हविस् द्रव्य आहे. हविस् द्रव्य म्हणजेच जीवनातील शब्दस्पर्शरूपरसगंधादि भोग्य विषय आहेत. त्या सर्वांचे अर्पण करावे. त्यासाठीच शास्त्रात अनेक प्रकारची दाने सांगितलेली आहेत. अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान या सर्व दानांमधून अर्पण वृत्ति आत्मसात करण्यास सांगितलेली आहे.

थोडक्यात, स्वतःमध्ये असणारे ममत्व, स्नेह, ऐहिक, पारलौकिक कामनेचा त्याग करावा. या यज्ञाचे हविस् द्रव्य म्हणजे प्रत्येक जिवामध्ये असणारा अहंकार आहे. अहंकाराला अर्पण करणे हीच या यज्ञाची पूर्णाहुति आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006




- हरी ॐ

Tuesday, August 18, 2015

विश्वनिर्मितीचा मानसिक यज्ञ | Mental Yajnya of Creation


यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत |  वसन्तो अस्याऽऽसीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरध्दविः  || ६ ||
सृष्टि निर्माण करण्यासाठी काही प्रक्रिया आवश्यक आहे.  निर्मितीसाठी प्रथम Raw Material हवे.  साधी टाचणी जरी निर्माण करायची असेल तर त्यामागे विचार हवा, Technical Knowhow पाहिजे.  जसे, इमारत बाहेर निर्माण होण्यापूर्वी ती प्रथम Engineer च्या बुद्धीत कल्पनारूपाने तयार होते.  त्याचप्रमाणे, पुरुषाने (परब्रह्म) विश्वाची निर्मिती अतिशय विचारपूर्वक, योजनाबद्ध पद्धतीने केलेली आहे.  त्यामुळेच लाखो वर्षे सूर्य, चंद्र, तारे, ऋतु अव्याहतपणे कार्य करीत आहेत.  मग त्या पुरुषाने ही निर्मिती करण्यासाठी सामग्री कोठून आणली ?  विश्वनिर्मितीपूर्वी बाह्य सामग्रीच उपलब्ध नसल्यामुळे या देवांनी मानसिक, संकल्परूप यज्ञ केला.

या मानसिक यज्ञामध्ये वसंत ऋतु हा तूप होता.  ज्याप्रमाणे यज्ञामध्ये तूप टाकल्यावर अग्नीचा भडका होतो.  त्याचप्रमाणे, हे विश्वच जणु काही यज्ञकुंड आहे.  वसंत ऋतूच्या आगमनाने संपूर्ण सृष्टि फुलते, बहरते.  झाडांना नवीन पालवी फुटते.  म्हणून वसंत ऋतूला तूप असे म्हटले आहे.

ग्रीष्म ऋतु हा जणू काही या यज्ञाचा प्रज्वलित झालेला अग्नि आहे.  ग्रीष्म ऋतूमध्ये सर्व झाडे, फांद्या शुष्क होतात.  त्यांच्या समिधा बनतात. यज्ञामध्ये हवन करण्यासाठी सामिधांची आवश्यकता आहे.  समिधा या शुष्क असतात.  ग्रीष्म ऋतूमध्येच पृथ्वी शुष्क होते.  म्हणून या यज्ञामध्ये ग्रीष्म ऋतु हाच अग्नि आहे.

शरद ऋतूमध्ये पृथ्वीवर धनधान्याची समृद्धि असते.  घर धनधान्याने भरून जाते.  यज्ञामध्ये व्रीहि, यवादि धान्य हेच हविस् द्रव्य असल्यामुळे शरद ऋतु हेच या यज्ञामधील पुरोडाश, धनधान्यादि हविस् द्रव्य आहे.  म्हणून शरद ऋतु धनधान्य देऊन या यज्ञाला साहाय्य करतो.

देवांचा मानसिक यज्ञ सांगण्यामागे श्रुतीला केवळ बाह्य यज्ञ किंवा कर्मकांड अपेक्षित नसून साधकाला यामधून काहीतरी श्रेष्ठ सांगावयाचे आहे… क्रमशः


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ

Tuesday, August 11, 2015

तुज आहे तुजपाशी | You Have It Within You


पुराणामध्ये एक सुंदर गोष्ट आहे.  ब्रह्माजीने सर्व सृष्टि निर्माण केली. सर्वात शेवटी त्याला प्रश्न पडला की, त्याचे स्वतःचे आत्मलिंग कोठे ठेवावे ?  देवांनी ब्रह्माजीला ते स्वर्गात ठेवण्यासाठी सुचविले, पण राक्षस म्हणाले की, मनुष्य तुमचे स्वरूप शोधण्यासाठी स्वर्गात येईल म्हणून तुम्ही ते स्वरूप नरकात ठेवा.  तेथे कोणीही येणार नाही.  पण त्यावर देव म्हणाले की, मनुष्य इतका चतुर आहे की, ते स्वरूप प्राप्त करण्यासाठी तो नरकात जायलाही कमी करणार नाही.

शेवटी विचार करता-करता ब्रह्माजीलाच आत्मलिंग ठेवण्यासाठी एक अलौकिक स्थान सुचले आणि ते म्हणजे मनुष्याचे स्वतःचेच अंतःकरण !  स्वतःच्या अंतःकरणामध्ये मनुष्य कधीही आत शोध घेणार नाही, कारण हा बुद्धिमान आहे, परंतु बहिर्मुख असल्यामुळे मनुष्य चौदा भुवने हिंडेल, स्वर्ग, पाताळ, सर्व विश्व, सर्व विषय, त्यांचे भोग यामध्ये ते स्वरूप शोधेल पण स्वतःच्याच आतच असणारे, अत्यंत समीप असणारे ते स्वरूप तो शोधणार नाही.  मनुष्य जिथे शोधतो तिथे ते नाही.

त्यासाठीच श्री संत तुकाराम महाराज म्हणतात – तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी |

किंवा संत कबीर म्हणतात –
लहर ढ़ूंढे लहर को कपडा ढ़ूंढे सूत |
जीव ढ़ूंढे ब्रह्म को तीनों ऊत के ऊत ||

लाटेने केलेला पाण्याचा शोध, कपड्याने केलेला सूताचा शोध जसा निरर्थक आहे तसाच जीवाने केलेला ब्रह्माचा शोध निरर्थक आहे, कारण ती प्राप्ति ही – प्राप्तस्य प्राप्तिः | आहे.  ते स्वरूप कोठून बाहेरून प्राप्त करायचे नसून आपल्या आतच त्याचा शोध घ्यावयाचा आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ

Tuesday, August 4, 2015

पुरुषसूक्ताचे महात्म्य | Significance of Purushsuktam


वेदांच्यामध्ये अनेक देवतांची स्तुति आहे.  त्यामुळे त्या त्या देवतांची सूक्ते आहेत.  त्यामध्ये पुरुष म्हणजेच साक्षात ब्रह्मस्वरूपाची स्तुति असणारे अत्यंत प्रसिद्ध पुरुषसूक्त सोळा ऋचांचे आहे.  सूक्त याचा अर्थ स्तवन, स्तुति ! सूक्तं – शोभनं उक्तम् | या सोळा ऋचांमधून श्रुति पुरुषाची म्हणजेच ब्रह्माची स्तुति करते.  ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांच्यामध्ये पुरुषसूक्त अंतर्भूत होते.

सर्व वेदात याला महत्व आहे, कारण यात श्रुति केवळ निर्गुण स्वरूप न सांगता सगुण व निर्गुण दोन्हीही स्वरूप प्रतिपादित करते.  तसेच सर्व वेदांचा सिद्धांत ‘तत् त्वम् असि |’  देखील प्रतिपादित करते.

पुरुषसूक्तामध्ये प्रत्येक मनुष्याला वैयक्तिक जीवनाच्या विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे.  त्याचबरोबर एक मनुष्य म्हणून ज्यावेळी आपण या विश्वात, समाजात, निसर्गात जीवन जगतो त्यावेळी प्रत्येकाचा अधिकार, कर्तव्ये, माणसा-माणसांच्यामधील परस्परसंबंध, मनुष्याची खऱ्या अर्थाने उत्क्रांती व त्यासाठी असणारी साधना यामध्ये सांगितलेली आहे.

मनुष्य, निसर्ग यात काही संबंध, सूत्र आहे. ज्ञात, अज्ञात घटकांमुळेच माणूस जीवन जगतो.  तेव्हा त्याचे कर्तव्य काय आहे ?  स्वतःला दिलेल्या बुद्धीच्या साहाय्याने त्याने प्रगति कशी करावी व परमोच्च अवस्थेला कसे जावे ?  याचे मार्गदर्शन तसेच, व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजविकासाचेही येथे मार्गदर्शन केलेले आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ